ंलिफाफ्यातील ‘त्या’ रकमेचे गूढ कायम
By admin | Published: November 27, 2015 01:24 AM2015-11-27T01:24:50+5:302015-11-27T01:24:50+5:30
गुरूवारी येथील ग्रामपंचायतीच्या आमसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी काही रक्कम असलेले लिफाफे सरपंचाला परत केले.
घुग्घुस : गुरूवारी येथील ग्रामपंचायतीच्या आमसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी काही रक्कम असलेले लिफाफे सरपंचाला परत केले. मात्र हा प्रकार काय आहे, याचा उलगडा झाला नाही. त्यामुळे तो चर्चेचा विषय बनला आहे. याविषयावरून आमसेभात काही वेळ गोंधळ निर्माण झाला.
गुरूवारी घुग्घुस ग्रामपंचायतीच्या झालेल्या आमसभेत विकासाचे नियोजन, अंदाजपत्रक मंजूर करणे, या बरोबरच तंटामुक्त अध्यक्षाची निवड करणे आदी विषय होते. दरम्यान सरपंचाने विरोधी सदस्यांना दिवाळीपूर्वी काही रक्कम असलेली पाकीटे पाठविली होती. मात्र सदस्यांनी आमसभेत रकमेची पाकीटे सरपंचांना परत केलीत. तीन महिन्यांपुर्वी काँग्रेस सत्तेवर आली. मात्र अद्याप कोणत्याही विकास कामाची सुरुवात झाली नाही. कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती बरोबर नसतानाही दिवाळी अग्रीम रक्कम त्यांना देण्यात आली नाही. उलट सरपंचाने विरोधी गटातील सातही सदस्यांना चार हजार रुपयांची पाकीटे कर्मचाऱ्यांकरवी का पाठविली आणि ती त्या सदस्यांनी कशी स्वीकारली, गुरूवारी झालेल्या आमसभेत त्या पाकीटातील रक्कम का परत केली, असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. मात्र हा प्रकार नागरिकांनी गांभीर्याने घेतला. ती रक्कम कुठून देण्यात आली याची चौकशी करून खुलासा सत्तारूढ सरपंचाने व विरोधी सदस्यांकडून व्हावा अशी आग्रही मागणी नागरिकांकडून केली जात आहे एकूणच आजच्या सभेत घडलेल्या प्रकाराने नागरिकही अचंबित झाले आहेत. (वार्ताहर)