शिक्षकांच्या वेतनातून वसूल होणार वाहन भत्त्याची रक्कम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 01:08 PM2024-09-16T13:08:44+5:302024-09-16T13:09:55+5:30
स्थानिक निधी लेखा परीक्षण अहवाल: उन्हाळी सुटीमध्ये दिला वाहन भत्ता
साईनाथ कुचनकार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : उन्हाळ्यात शाळांना सुटी महिन्यातील वाहन भत्ता प्रशासनाने असतानाही मे आणि जून या शिक्षकांच्या वेतनात अदा केला. ही बाब स्थानिक निधी लेखा परीक्षणात उघडकीस आली. यानंतर ब्रह्मपुरी पंचायत समिती अंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या सप्टेंबर महिन्याच्या वेतनातून वाहन भत्ता रक्कम वसूल केली जाणार आहे. या प्रकारामुळे शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
ब्रह्मपुरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या शिक्षकांना मे आणि जून २०२३ च्या वेतन देयकात वाहन भत्ता अदा करण्यात आला. स्थानिक निधी लेखा परीक्षण अहवाल सादर करण्यात आला. या अहवालामध्ये सुटी असतानाही भत्ता अदा कसा करण्यात आला, असा आक्षेप घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन वित्त विभाग परिपत्रक ९ मे २००३ प्रमाणे ३० दिवसांपेक्षा दीर्घ सुटी कालावधीत वाहतूक भत्ता अनुज्ञेय नाही. शिक्षकांना दरवर्षी १ मे ते ३० जून या कालावधीत दीर्घ सुटी असते. उन्हाळी सुटीत वाहतूक भत्ता देय नसतानाही अदा करण्यात आल्याचे लेखा परीक्षण अहवालात म्हटले आहे.
वसुलीची जबाबदारी मुख्याध्यापकांवर
वाहन भत्ता अदा केल्यानंतर आता सावरासावर केली जात आहे. दरम्यान, ब्रह्मपुरी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवून अदा केलेला वाहन भत्ता सप्टेंबर २०२४ च्या वेतन देयकात वसूल करण्याचे तसेच देयक ऑनलाईन सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
६ लाख ३२ हजार ४२६ होणार वसूल
ब्रह्मपुरी पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या सप्टेंबर महिन्यातील वेतनातून आता अदा केलेली रक्कम परत घेतली जाणार आहे. यामध्ये ६ लाख ३२ हजार ४२६ रुपये वसूल केले जाणार आहेत.