महिना लोटूनही धान विक्रीची रक्कम मिळाली नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:20 AM2021-07-15T04:20:26+5:302021-07-15T04:20:26+5:30
सावरगाव परिसरातील अनेक गावांत पाण्याचे साधन असल्याने उन्हाळी धान्य पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. येथील आदिवासी विविध ...
सावरगाव परिसरातील अनेक गावांत पाण्याचे साधन असल्याने उन्हाळी धान्य पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेत एकूण ३३२ शेतकऱ्यांची नोंद आहे. यापैकी २२० शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी झाली आहे आणि ११२ शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी बारदाण्याअभावी थांबविण्यात आली आहे. दरम्यान, येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेने जूनमध्येच उन्हाळी धान्याची खरेदी केली आहे. धान्य खरेदी केल्यापासून आज जवळपास एक महिना उलटत चालला आहे. मात्र, अजूनसुद्धा एकाही शेतकऱ्याच्या खात्यात खरेदी केलेल्या धान्याची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे येथील शेतकरी आर्थिक कोंडीत सापडलेला आहे. दुसरीकडे शेतीच्या खरीप हंगामालाही सुरुवात झाली आहे. तेव्हा शेतमजुरांना मजुरीचे पैसे द्यायचे कुठून, हा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.
बॉक्स
बोनसही नाही
त्याचप्रमाणे पावसाळी धान्य खरेदीचा ७०० रुपयांप्रमाणे बोनसची रक्कमसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनपर्यंत जमा झालेली नाही. याशिवाय उन्हाळी धान खरेदीचा कालावधीसुद्धा आता संपत चालला असतानाही बारदाना उपलब्ध नसल्याकारणाने धान खरेदी बंद पडली आहे. अशा चौफेर आर्थिक कोंडीत अडकवून संबंधित विभागाकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्यात येत आहे.