विड्याची पानं विकून ८६ वर्षीय वृद्धा जगते आत्मनिर्भर आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 04:34 PM2023-02-08T16:34:09+5:302023-02-08T16:39:14+5:30
पानवाली आजीबाई ८६ वर्षांच्या; उत्साह मात्र तरुणाईचा!
पी.एच. गोरंतवार
पोंभूर्णा (चंद्रपूर) : वृद्धापकाळाने जगण्याची नांगी टाकून आयुष्य लाचारीने जगणारे वृद्ध काही ठिकाणी पाहायला मिळतात. मात्र, या परिस्थितीशीही दोन हात करून स्वाभिमानाने आत्मनिर्भर होऊन जगणारे वृद्ध काही कमी नाहीत.
पोंभूर्ण्यात अशीच एक स्वाभिमानी वृद्धा शिक्षणाची दैवत सावित्रीबाई फुले बसस्टॉप चौकात विड्याची पानं विकून वृद्धापकाळाच्या मानगुटीवर लाथ मारून आत्मनिर्भर आयुष्य जगत आहे. ‘पानवाली आजीबाई’ या नावाने ती परिचित आहे. ही तिची न पुसणारी ओळख पोंभूर्ण्याची शान आहे. पोंभूर्णा शहरातील गांधी चौकात वास्तव्यास असलेल्या वच्छलाबाई गजानन बल्लावार (८६) असे या वृद्ध महिलेचे नाव.
वच्छलाबाई यांचे माहेर कोरपना तालुक्यातील परसोडा येथील. त्या सधन शेतकरी कुटुंबातील. घरी १५ एकर शेती. गावातील प्राथमिक शाळेतच त्यांना शिक्षणासाठी टाकण्यात आले. मात्र, शाळेत तेलगू शिक्षण असल्याने त्या गावात शिकल्या नाहीत. भद्रावती येथे मामाच्या गावाला येऊन दुसरीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. वच्छलाबाईंचे कोवळ्या वयात १५ व्या वर्षी लग्न पोंभूर्ण्यातील दोन एकर शेती असलेल्या गजानन बल्लावार यांच्याशी झाले.
सासरी नवऱ्याचे पेपरमेंट गोळ्यांचे दुकान होते. जिल्हा परिषद व जनता शाळेतील मुले या दुकानात तोबा गर्दी करायचे. म्हणून वच्छलाबाई दुकानात बसू लागल्या. किराणा सामानासोबत विड्याची पानं दुकानात ठेवू लागल्या. आणि यातूनच पुढे विड्याच्या पानांची विक्री सुरू झाली. सुरुवातीला १० रुपयांच्या टोपल्यात ३,५०० विड्याची पाने असायची. १० रुपयांवर मुनाफा म्हणून २५० रु. कमवायच्या. त्यावेळी पानं खाणाऱ्यांची संख्याही जास्त असल्याने त्या यातून बऱ्यापैकी अर्थार्जन करायच्या. आणलेली पाने विकायला कधी कधी पंधरवडा लागायचा. ही पानं जास्त दिवस टिकावीत, खराब होऊ नयेत म्हणून त्या काळजी घ्यायच्या.
हळूहळू पेपरमेंट गोळ्यांची विक्री काळानुरूप बंद झाली. आसरा होता तो फक्त विड्याच्या पानांचाच. वच्छलाबाईंनी मात्र न डगमगता कंबरेला पदर खोचून व्यवसायाचा डोलारा विड्याच्या पानावर तोलून धरला. वच्छलाबाईंच्या संसाररूपी वेलीवर दोन मुले अंकुरली होती. मुलांचे संगोपन, शिक्षण त्यांनी उत्तमरीत्या केले. मोठा मुलगा अविवाहित राहिला अन् त्याचा वयाच्या पन्नाशीत मृत्यू झाला. लहान मुलगा रवींद्र याचे लग्न व संसाराचा गाडा वच्छलाबाईंनी सुव्यवस्थित बसवून दिला.
‘जिंदगीशी कसलीही तक्रार नाही गा, बाबा’
काळानुरूप आता विड्याचे पान खाणे जवळजवळ बंदच झाले आहे. सुगंधित तंबाखूच्या खर्याला जास्त पसंती आहे. त्यामुळे विड्याची पानं विकणाऱ्यांवर मोठी संक्रांत आली आहे. पण, यावरही मात करत त्या पानाचा व्यवसाय करीत आहेत. भाऊबीज असो, रक्षाबंधन असो, पूजा असो, साक्षगंध असो की लग्न कार्यक्रम असो विड्याची पानं आवश्यकच. सर्वच जण अशावेळी वच्छलाबाईंकडे धाव घेतात. आज विड्याची पानं महागली आहेत. विड्याच्या पानांची टोपली आज १२०० रुपयांची झाली आहे. शेकडा ८० रुपये याप्रमाणे पानं विकली जातात. पूर्वीसारखा मुनाफा आज नसला तरी वच्छलाबाई स्वतःच्या पोटापाण्याचा प्रश्न मात्र अगदी हसतखेळत भागवतात. ‘जिंदगीशी कसलीही तक्रार नाही गा, बाबा’ म्हणणारी ८६ वर्षांची पानवाली आजीबाई आत्मनिर्भर होऊन जीवन जगत आहे.