सिंदेवाहीत आणखी आढळली अवकाशातून पडलेली वस्तू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2022 10:48 AM2022-04-12T10:48:06+5:302022-04-12T10:51:40+5:30
अवकाशातून पडलेल्या या वस्तूंबद्दल नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले होते.
सिंदेवाही (चंद्रपूर) : तालुक्यात विविध भागात आकाशातून पडलेले अवशेष मिळणे सुरूच आहे. सावरगाटा जंगलात असाच एक धातूचा तुकडा आढळला. प्रशासनाकडे हे अवशेष जमा करण्यात आले आहेत.
तालुक्यात लाडबोरी येथे पहिल्यांदा अवकाशातून मोठी रिंग पडलेली नागरिकांना दिसली होती. त्यानंतर पवनपार, मरेगाव, गुंजेवाही कोटा, असोलामेंढा तलाव व ब्रह्मपुरी क्षेत्रातील बोदरा, सालदा येथे गोलाकार सिलिंडर व अवशेष मिळाले. अवकाशातून पडलेल्या या वस्तूंबद्दल नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले होते. सावरगाटा येथे पाथरी रोडवरील जंगलात मोह वेचायला गेलेल्या नामदेव लोनबले यांना अवशेषाचा एक तुकडा दिसून आला. ही माहिती त्यांनी प्रशासनाला दिली.
हे अवशेष प्रशासनाकडे जमा केले आहेत. अवकाशातून पडलेले अवशेष रोज कुठे ना कुठे मिळणे सुरूच आहेत. जिल्हा प्रशासनाद्वारे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोशी संपर्क केला असता इस्रोचे एक पथक सिंदेवाही व इतर अवशेष पडलेल्या ठिकाणी भेट देऊन निरीक्षण करून गेले. या वस्तूंबाबत इस्रोचा निष्कर्ष नेमका काय असेल याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.