बाप्पा मोरयाचा गजर निनादला
By admin | Published: September 16, 2016 01:36 AM2016-09-16T01:36:18+5:302016-09-16T01:36:18+5:30
ढोलताशाचा गजर आणि डीजेचा ताल, संदल, बँडचे ठोके, या धुंद वातावरणात लाडक्या बाप्पाला गुरूवारी
चंद्रपूर : ढोलताशाचा गजर आणि डीजेचा ताल, संदल, बँडचे ठोके, या धुंद वातावरणात लाडक्या बाप्पाला गुरूवारी आनंदात निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरय्या, पुढच्या वर्षी लकवर’ या अशा आवाजाने चंद्रपुरातील कस्तुरबा गांधी मार्ग व गांधी मार्ग निनादून गेले होते.
गुरूवारी सकाळपासूनच मिरवणुका निघण्याला प्रारंभ झाला. सकाळी पाऊस येण्याची शक्यता वातावरणावरून दिसून येत होती. मात्र दुपारी थोडी उन्ह निघाल्याने १२ वाजतानंतर मिरवणुका निघण्याला सुरूवात झाल्या. वातारण चांगले असल्याने सायंकाळी भाविकांची अलोट गर्दी उसळली आणि बाप्पा मोरय्याचा गजर यामुळे अख्खे चंद्रपूर शहर निनादून गेले. यावेळी शहरातील प्रमुख मार्गावर गणेशभक्तांची गर्दी आणि विविध गणेशमंडळांनी केलेली आकर्षक सजावट व देखावे मिरवणुकीत लक्ष वेधून घेत होते.
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी चंद्रपूर शहरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. सकाळपासूनच मिरवुका काढण्याला प्रारंभ झाल्याने जुना वरोरा नाका येथून कस्तुरबा गांधी मार्गाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली. दुपारी १२ वाजताच्या सुमारास कस्तुरबा गांधी मार्गावर जटपुरा गेटपासून आझाद बगीचापर्यंत मिरवणुकांची रिघ लागली होती. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णत: बंद करण्यात आला. दुपारी १ ते २ वाजताच्या सुमारास मिरवणुका गांधी चौकात पोहोचल्या. यावेळी बाबुपेठ, गिरणार चौक परिसरातील गणेश मंडळेही मिरवणुकीत सहभागी झाले आणि ढोलताशे, डीजेची धूम सुरू झाली. दुपारी २ वाजेपर्यंत रामनगर, नगिना बाग मार्ग, भानापेठ, पठाणपुरा मार्ग, अंचलेश्वर गेटच्या आतील मार्गावर विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. वरोरा व बल्लारपूर, कोरपना येथेही गुरूवारी विसर्जन पार पडले.(स्थानिक प्रतिनिधी)
जटपुरा गेटवरून पुष्पवर्षाव
४चंद्रपूर येथील जटपुरा गेटवरून प्रशासनातर्फे गणेशमंडळाचे स्वागत करण्यात येत होते. उपस्थित असलेले अधिकारी आणि शांतता कमेटी सदस्यांतर्फे बाप्पावर पुष्पवर्षाव करण्यात येत होते. जिल्हा पोलीस अधीक्षकांचे यावर लक्ष होते. गांधी चौक, गिरनार चौक, आंबेडकर चौक, जयंत टॉकीज चौक, जटपुरा गेट या ठिकाणी मचाणी उभारून पोलिसांकडून परिस्थितीवर नजर ठेवली जात होती. यंदा महिलांची लक्षणीय गर्दी पाहता महिला पोलीस कर्मचाऱ्यांची विशेष कुमक मागविण्यात आली होती. जटपुरा गेटवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व गणेश मंडळांवर पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले. गांधी चौकात शांतता समितीच्या वतीने गणेशमंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे पुष्पहार, श्रीफळ देवून स्वागत करण्यात येत होते. चंद्रपूर पोलिसांसह पोलीस मित्र, इको-प्रोचे सदस्य बंदोबस्तात महत्त्वाची भूमिका बजावत होते.