आनंदवनातून होणार वन महोत्सव प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 11:18 PM2019-06-27T23:18:39+5:302019-06-27T23:19:10+5:30

राज्यातील वृक्षांचे आच्छादन २० टक्क्यावरून ३३ टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी राज्याचे अर्थ, नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून हरित महाराष्ट्र प्रकल्प राबविण्यात येत आहे. याअंतर्गत सन २०१६ पासून ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी यंदा ३३ कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले. १ जुलै २०१९ रोजी आनंदवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणीस यांच्या हस्ते वन महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.

Anandavna will be the beginning of the Van Mahotsav | आनंदवनातून होणार वन महोत्सव प्रारंभ

आनंदवनातून होणार वन महोत्सव प्रारंभ

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्री उपस्थित राहणार : वन महोत्सवात प्रत्येकांनी सहभागी व्हावे- पालकमंत्री

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्यातील वृक्षांचे आच्छादन २० टक्क्यावरून ३३ टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी राज्याचे अर्थ, नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून हरित महाराष्ट्र प्रकल्प राबविण्यात येत आहे. याअंतर्गत सन २०१६ पासून ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी यंदा ३३ कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले. १ जुलै २०१९ रोजी आनंदवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणीस यांच्या हस्ते वन महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
मोहिमेचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी आनंदवन येथे बैठक घेण्यात आली. यावेळी डॉ. विकास आमटे, डॉ. शितल आमटे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव आदी उपस्थित होते. शासनाने विविध विभाग तसेच जनसामान्यांच्या सहभागातून राज्यात १ जुलै २०१६ रोजी २ कोटी ८२ लाख वृक्षलागवड करून लक्ष पूर्ण केले. २०१७ रोजी वनमहोत्सव कालावधीमध्ये ५ कोटी २७ लक्ष वृक्षलागवड करून ४ कोटीचे लक्ष पूर्ण केले. २०१८ रोजी १५ कोटी २७ लक्ष वृक्ष लागवड करून १३ कोटी वृक्ष रोपणाचा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. यंदाचा वन महोत्सव १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, वन विकास महामंडळ व इतर शासकीय व निमशासकीय विभाग जिल्ह्यातील स्वयंसेवी, सहकारी संस्था, शाळा, महाविद्यालय, एनएसएस व एनसीसीच्या वतीने राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यासाठी १ कोटी ६७ लाखांचे उद्दिष्ट
यंदा वनमहोत्सव कालावधीमध्ये ३३ कोटी वृक्ष लागवड केली जाणार आहे. याकरिता जिल्ह्यात वनविभाग, इतर यंत्रणा व ग्रामपंचायतींना १ कोटी ६७ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. वन विभागाचे ८१ लक्ष वृक्ष लागवडीचे नियोजन असून सामाजिक वनीकरण १५ लक्ष तर वन विकास महामंडळाचे १९ लक्ष वृक्ष, वन्यजीव विभाग १ लाख ३० हजार, इतर यंत्रणा ३३ लक्ष आणि ग्रामपंचायतींनी २५ लक्ष वृक्ष लागवडीचे नियोजन केलेले आहे. एकूणच जिल्ह्याला १ कोटी ७८ लक्ष वृक्ष लागवडीचे नियोजन प्राप्त झाले. त्यासाठी १ कोटी ८० लक्ष रोपे तयार करण्यात आली आहेत.
आनंदवन घन वन प्रकल्प
आनंदवन येथील महारोगी सेवा समितीने मियावाकी हा जपान प्रकल्प उत्तमरित्या विकसित केला आहे. ही बाब विचारात घेऊन वनमंत्री मुनगंटीवार यांनी राज्यात अटल आनंदवन घन वन प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला. हा प्रकल्प शहरी व ग्रामीण भागांमध्ये यशस्वीरित्या राबवण्यासाठी मार्गदर्शक सूचनाही जाहीर करण्यात आल्या आहेत.
‘ग्रीन आर्मी’ चे सभासद व्हा
वनविभागाचे उपक्रम सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी वनविभागाने ग्रीन आर्मी अर्थात हरित सेना या नव्या उपक्रमाची सुरुवात केली आहे. याद्वारे वनविभागाने ३ वर्षांत ५० कोटी वृक्ष लागवड हा कार्यक्रम हाती घेतलाअसून ग्रीन आर्मी स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे. यात सहभागी होता येणार आहे.
वृक्ष लागवड मोहिमेसाठी समित्यांचे गठण
वन महोत्सवासाठी ग्राम, तालुका, जिल्हास्तरीय समित्या स्थापन झाल्या. जिल्हा समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार तर सदस्य सचिव म्हणून विभागीय वनाधिकारी एस.एल. सोनकुसरे काम पाहत आहेत. वृक्ष लागवडीची कामे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून जिल्हाधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीची रूपरेषा व अंमलबजावणीचे नियोजन तयार केले. या कामाचे महत्त्व लक्षात घेऊन इतर विभागांशी समन्वय व्हावे, रोपांची उपलब्धता व वृक्ष लागवड कार्यक्रमाची माहिती मिळावी, यासाठी तालुका समन्वयक अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.

Web Title: Anandavna will be the beginning of the Van Mahotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.