आनंदवन हे वृद्धांना दृष्टी देणारे नंदनवन आहे
By Admin | Published: December 8, 2015 12:55 AM2015-12-08T00:55:16+5:302015-12-08T00:55:16+5:30
कर्मयोगी बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांना सोबत घेऊन आनंदवनाची स्थापना केली,..
दीपक सावंत : आनंदवनातील मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला भेट
वरोरा : कर्मयोगी बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांना सोबत घेऊन आनंदवनाची स्थापना केली, त्या आनंदवनाची किर्ती सातासमुद्रापलीकडे गेली आहे. कुष्ठरोग्यासोबतच आनंदवनात अंध, मूकबधिर, वृद्ध, अपंग यांच्यासह अनेक युवक-युवती व वृद्ध बाबांची प्रेरणा घेऊन श्रम ही श्रीराम है, या या उक्तीप्रमाणे स्वावलंबी जीवन जगत आहे. आजच्या आनंदवन नेतृत्व तिसरी पिढी करीत आहे. त्या तिसऱ्या पिढीच्या नेतृत्वात आनंदवनात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर मागील कित्येक वर्षांपासून यशस्वीपणे राबवून हजारोना दृष्टी देण्याचे काम डॉ. तात्यासाहेब लहाने व त्यांची चमू करीत आहे. त्याचमुळे डॉ. विकास आमटेंच्या नेतृत्वात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात दृष्टी देण्याचे काम आनंदवनात सुरू आहे. त्यामुळेच आता आनंदवन वृद्धांना दृष्टी देणारे नंदनवन म्हणून जगात प्रसिद्ध झाले आहे, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी सोमवारी आनंदवनात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या भेटीप्रसंगी केले.
यावेळी मंचावर महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे, डॉ. भारती आमटे, जेजे रुग्णालयाचे डॉ. टी.पी. लहाने, वरोरा विधानसभेचे आमदार बाळू धानोरकर, डॉ. शीतल आमटे (कर्जईत), गौतम कर्जईत, डॉ. विजय पोळ, आदी उपस्थित होते.
कर्मयोगी बाबांचे कार्य मी ऐकले होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी मी आनंदवनला भेट देवून डॉ. विकास आमटेंची भेट घेतली. शिवसेनेचे विधानसभा निवडणुकीतील उमेदवार बाळू धानोरकर यांना मदत करण्याची विनंती केली असता, डॉ विकास आमटे यांनी सांगितले की, आम्ही राजकारणी नाही व राजकारणात मदत करणार नाही. तरीपण मी त्यांना विनंती केली व बाळू धानोरकर हे धडाडीचे कार्यकर्ते असल्याने त्यांना आशीर्वाद द्या, अशी विनंती केल्याचा आवर्जुन उल्लेख ना. दीपक सावंत यांनी केला.
शासकीय मोतीबिंदू शिबिरात अनेक अडचणी येतात. शस्त्रक्रियेदरम्यान काहींचे डोळे खराब झाल्याच्या घटना विदर्भातील वाशिम जिल्ह्यात घडल्या. अशा घटना घडल्या असतानाही त्यातील अनेकांना मुंबईतील जेजे रुग्णालयात नेवून तात्यासाहेब लहाने व त्यांच्या चमूने त्यांना दृष्टी देण्याचे काम केले. ही बाब शासकीय यंत्रणेसाठी आणि माझ्या आरोग्य विभागासाठी अभिनंदनीय असल्याचे ते म्हणाले.
कर्मयोगी बाबांच्या आनंदवनात मागील कित्येक वर्षांपासून शासकीय यंत्रणेमार्फतच मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे यशस्वी आयोजन केले जाते. ही संपूर्ण महाराष्ट्र व भारताच्या आरोग्य चेतनेविषयी अभिनंदनाची बाब आहे. आनंदवनाच्या शिबिरात शासकीय वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी शासकीय वेळेचे बंधन झुगारून १८ ते २० तास अविरत काम करतात. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवर होणारे आरोप फेटाळले जातील व नागरिकांना शासकीय आरोग्याच्या अधिकाअधिक सेवा मिळतील. त्यातून त्यांचे आरोग्य सुदृढ राहील, असा आशावाद ना. दीपक सावंत यानी व्यक्त केला.
वरोरा विधासभा क्षेत्रात जनसेवे एक लढावू नेतृत्वाच्या रूपात आ. बाळू धानोरकर यांना प्रतिनिधित्व दिले. अशा समाजोपयोगी कार्यक्रमास आपले नेतृत्व पनास लावतील व ते कार्य नेटाने आमदार धानोरकर पूर्णत्वास नेतील, असा आशावाद आरोग्य मंत्री दीपक साावंत यानी व्यक्त केला. महाराष्ट्रातील कुष्ठरोगाचा नायनाट करण्याकरिता राज्यस्तरावर एक अभ्यास समिती शासन स्तरावर प्राथमिक तत्त्वावर समिती स्थापन करणार असुन या समितीचे मार्गदर्शक म्हणून डॉ. विकास आमटे मार्गदर्शन करतील व डॉ. विकास आमटेच्या मार्गदर्शनामुळे ही समिती कुष्ठरोगांचा सखोल अभ्यास करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर करतील. या अहवालावरून राज्याने कुष्ठरोगाचा नायनाट होईल व कुष्ठरोगाचा दर शून्य टक्क्यावर येईल, असा विश्वास ना. दीपक सावंत यांनी व्यक्त करत आनंदवनला शासनाकडून पुरेपूर मदत करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी कार्यक्रमाचे संचालन जेजे रुग्णालय नेत्र विभाग प्रमुख डॉ. रागिनी पाटणे तर आभार प्रदर्शन महारोगी सेवा समितीचे विश्वस्त सुधाकर कडू यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)