शंकर लोधीच्या गुफेत दडलाय चंद्रपूरचा प्राचीन इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:30 AM2020-12-06T04:30:36+5:302020-12-06T04:30:36+5:30

चंद्र्रपूर : गोंड राजांची राजधानी म्हणून चंद्रपूरची देशभरात ओळख असली तरी प्राचीन इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा जिल्ह्यात आहेत. नैसर्गिक वारसा ...

Ancient history of Chandrapur hidden in the cave of Shankar Lodhi | शंकर लोधीच्या गुफेत दडलाय चंद्रपूरचा प्राचीन इतिहास

शंकर लोधीच्या गुफेत दडलाय चंद्रपूरचा प्राचीन इतिहास

googlenewsNext

चंद्र्रपूर : गोंड राजांची राजधानी म्हणून चंद्रपूरची देशभरात ओळख असली तरी प्राचीन इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा जिल्ह्यात आहेत. नैसर्गिक वारसा लाभलेले जिवती तालुक्यातील शंकर लोधी येथील दुर्लक्षित गुफा पर्यटन ऐतिहासिक दृष्टीने महत्त्व राखून आहेत. पुरातत्त्व अभ्यासक व तज्ज्ञांनी यावर संशोधन केल्यास चंद्रपूरचा प्राचीन इतिहास पुढे येऊ शकतो. परंतु, याकडे अद्याप कुणाचेही लक्ष गेले नाही.

अतिदुर्गम माणिकगड पहाडावर वसलेली ८०-९० गावे समाविष्ट करून जिवती तालुक्याची निर्मिती झाली. या तालुक्यात शंकर लोधी हे ३० घरांचे गाव अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे. गावाला लागून एक नैसर्गिक गुफा आहे. जैवविविधतेच्या दृष्टीने तिचे महत्त्व आहे. पर्यटस्थळ म्हणूनही अद्भुत अशी नैसर्गिक रचना बघणे आनंददायक आहे. चुनखडी आणि सॅण्ड स्टोनच्या मिश्रणाचे पाणी या जमिनीत मुरल्याने अशा गुफा तयार होतात, असे अभ्यासक सांगतात. चंद्रपूरपासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. जाण्यासाठी स्वतंत्र वाहनच उत्तम पर्याय आहे. त्यातही चारचाकी वाहन असल्यास अधिक बरे. तीव्र उतार चढाव असून रस्त्यांची स्थिती खराब आहे. या गुफेचा अभ्यास केल्यास प्राचीन इतिहास पुढे येऊ शकतो.

अशी आहे गुफा

गुफेमध्ये सुमारे १०० फूट आत गेल्यावर पाणी आढळते. त्या ठिकाणी गुफेच्या छताला लटकलेले लवण स्तंभ आहेत. उन्हाळ्यात गुफेत सुमारे एक किलोमीटरपर्यंत आत जाता येते. आत अंधार, जागोजागी पाणी व प्राणवायूची कमी असल्याने साधनांशिवाय जाणे कठीण आहे. मात्र, या एक किलोमीटर परिसरात अत्यंत निर्मळ पाण्याचे प्रवाह, जमीन व छतावर असलेले लवण स्तंभ, भूलभुलय्यासारखे चकवा देणारे रस्तेही आहेत.

कोट

गेल्याच महिन्यात या गुफेला भेट दिली. स्वत:ला छत्तीसगडपेक्षा प्रगत समजणाऱ्या महाराष्ट्र व तेलंगणा या दोन्ही राज्यांकडून शंकर लोधीच्या या गुफेची अक्षम्य उपेक्षा सुरू आहे. संवर्धन व विकास तर सोडाच नकाशातदेखील हे गाव नोंदविण्यात आले नाही.

-किशोर जामदार, अभ्यासक चंद्रपूर

Web Title: Ancient history of Chandrapur hidden in the cave of Shankar Lodhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.