आणि बॉम्ब शोध पथक धडकले

By admin | Published: July 18, 2015 12:49 AM2015-07-18T00:49:04+5:302015-07-18T00:49:04+5:30

वेळ: दुपारी १.३० वाजता...स्थळ: चंद्रपुरातील आझाद बागेतील वाहनतळ...कचऱ्याच्या कंटेनगरलगत एक प्रवासी बॅग ठेवलेली...बराच वेळ ती बॅग एकाकी असते...

And the bomb exploded | आणि बॉम्ब शोध पथक धडकले

आणि बॉम्ब शोध पथक धडकले

Next

आझाद बागेतील घटना : बेवारस बॅग अन् पोलिसांची तत्परता
चंद्रपूर : वेळ: दुपारी १.३० वाजता...स्थळ: चंद्रपुरातील आझाद बागेतील वाहनतळ...कचऱ्याच्या कंटेनगरलगत एक प्रवासी बॅग ठेवलेली...बराच वेळ ती बॅग एकाकी असते...कुणीतरी मग शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप सिरस्कर यांना मोबाईलवरून बॅगबाबत माहिती देतो...सिरस्करही या प्रकाराचे गांभिर्य ओळखून लगेच आपल्या सहकाऱ्यांना घटनास्थळी धाडतात... पाठोपाठ तेदेखील पोहचतात... काही क्षणातच बॉम्ब शोधक पथकही तेथे दाखल होते... यंत्राद्वारे बॅगेची तपासणी केली जाते...मात्र त्यात सीएफएल बल्बचे रिकामे बॉक्स, कपड्यांवर लावण्याचे काही स्टीकर दिसून आले...आणि पोलिसांसह व तेथे उपस्थित नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
शहरातील आझाद बागेच्या परिसरात सदैव नागरिकांची वर्दळ असते. बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांची वाहने ठेवण्यासाठी येथे वाहनतळ निर्माण करण्यात आले आहे. याच ठिकाणी कचऱ्याचे एक कंटेनरही आहे. शुक्रवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास या कंटेनरशेजारी असलेल्या एका भिंतीवर काही साहित्य भरून असलेली एक प्रवासी बॅग अनेकांच्या नजरेत भरत होती. ती बॅग बऱ्याचवेळापासून एकाकी असल्याने अनेकांना त्याबाबत संशय आला. सदर बॅग सुस्थितीत असल्याने कुणीतरी ती विसरले असावे, असा अंदाज नागरिक व्यक्त करीत होते. त्या बॅगमध्ये अन्य काही घातक वस्तू तर नाही, अशीही शंका अनेकांना आली. यापुर्वीही कस्तुरबा मार्गावर एक संशयास्पद सुटकेस आढळून आली होती. याबाबत माहिती मिळताच शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जावून सुटकेसबाबत खातरजमा केली होती. (प्रतिनिधी)

पोलिसांचे प्रसंगावधान
एकाने पोलीस निरीक्षक प्रदीप सिरस्कर यांना या बॅगबाबत माहिती देतात, अवघ्या काही वेळात पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यापाठोपाठ ठाणेदार प्रदीप सिरस्कर हेदेखील तेथे पोहचले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून बॉम्ब शोधक पथकही घटनास्थळी पोहचले. एव्हाना या ठिकाणी कुतूहलापोटी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
यंत्राद्वारे केली तपासणी
बॉम्ब शोधक पथकाने अतिशय सावधतेने या बॅगची यंत्राद्वारे तपासणी केली. मात्र त्यात बॉम्ब नसल्याची खात्री पटताच, ती उघडण्यात आली. तेव्हा त्यात सीएफएल बल्बचे रिकामे डबे आढळून आले. इतरही काही साहित्य होते.
बॅग ठेवणाऱ्याचा घेणार शोध
मुळात निकामी वस्तू भरलेली बॅग कचऱ्याच्या कंटेनरमध्ये न टाकता खोडसाळपणे कंटेनरच्या बाजुला असलेल्या भिंतीवर संशयास्पदरित्या ठेवण्यात आली. ही बॅग नेमकी कुणी ठेवली याचा शोध पोलीस घेत आहेत.

नागरिकांच्या मनात भय निर्माण होईल, असे खोडसाळ कृत्य करणे हादेखील गुन्हा आहे. आजचा प्रकार हा त्यातलाच असावा, अशी शंका आहे. त्यामुळे आम्ही बॅग ठेवणाऱ्याचा शोध घेत आहोत. नागरिकांनीही अशा विषयात सतर्क राहून कुठे संशयास्पद वस्तू वा बॅग आढळून आल्यास पोलिसांना याबाबत माहिती द्यावी.
-प्रदीप सिरस्कर, निरीक्षक, शहर पोलीस ठाणे, चंद्रपूर

Web Title: And the bomb exploded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.