...अन् केरळमधील ‘त्या’ बालकाची कुटुंबीयांशी झाली भेट
By परिमल डोहणे | Published: October 13, 2023 07:43 PM2023-10-13T19:43:08+5:302023-10-13T19:43:21+5:30
महिला व बालविकास विभागासह चाइल्ड हेल्पलाइनने साधला होता संपर्क
चंद्रपूर: अत्यंत सैरभैर अवस्थेत बल्लारपूर रेल्वे पोलिस दलाला बल्लारपूर स्थानकावर ८ ऑक्टोबर रोजी एक बालक आढळला. पोलिसांनी याबाबत बालकल्याण समितीला माहिती दिली. त्या समितीने त्याच्याशी मुक्तसंवाद साधून त्याचा पत्ता शोधून काढला असता तो केरळमधील असल्याचे स्पष्ट झाले. समितीने त्याच्या पालकाला चंद्रपूर येथे बोलावून संपूर्ण कागदपत्रांची तपासणी करून त्या बालकाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले. दोन दिवसानंतर कुटुंबीयांची गळाभेट होताच उपस्थितांचे डोळे पाणावले होते.
बल्लारपूर स्थानकावर रेल्वे पोलिसांची चमू गस्त घालत असताना एक बालक आढळून आले. रेल्वे पोलिस दलाने चाइल्ड हेल्पलाइनला त्या बालकाची माहिती दिली. चाइल्ड हेल्पलाइन चमूने रेल्वे स्टेशन स्टेशन, बल्लारपूर येथे भेट देत बालकांची संपूर्ण माहिती जाणून घेतली. बालकाची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी व बालकल्याण समितीला दिली. तसेच समितीच्या आदेशान्वये, सदर बालकास शासकीय बालगृह येथे ठेवण्यात आले.
बालकल्याण समितीने बालकाच्या पालकांशी संपर्क साधला. चंद्रपूर येथे बालक असल्याचे सांगून पालकांना बोलावून घेतले व या केसबाबत बालकल्याण समितीशी चर्चा केली. १० ऑक्टोबर रोजी बालकाच्या पालकांना बालकल्याण समितीसमोर उपस्थित करण्यात आले. समितीने सर्व कागदपत्रांची तपासणी करून सदर बालकाला पालकांच्या ताब्यात दिले. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा क्षमा बासरकर, सदस्या ज्योत्स्ना मोहितकर, अमृता वाघ, वनिता घुमे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, चाइल्ड हेल्पलाइनचे प्रकल्प समन्वयक अभिषेक मोहुर्ले, प्रदीप वैरागडे आदींची उपस्थिती होती.