अन् सखुबाईच्या खात्यात पैसे जमा झाले
By admin | Published: January 7, 2015 10:49 PM2015-01-07T22:49:21+5:302015-01-07T22:49:21+5:30
वंचित आणि उपेक्षिताचे जीवन जगणाऱ्या भद्रावती येथील सखुबाई तुराणकर आणि त्यांच्या मुलीला अखेर उशिरा का होईना, पण न्याय मिळाला आहे.
अनुसयाबाईलाही न्याय मिळाला: तहसीलदारांनी घेतली दखल
सचिन सरपटवार - भद्रावती
वंचित आणि उपेक्षिताचे जीवन जगणाऱ्या भद्रावती येथील सखुबाई तुराणकर आणि त्यांच्या मुलीला अखेर उशिरा का होईना, पण न्याय मिळाला आहे.
‘अन् मुलगी झाली आईची आई’ या मथळ्याखाली २७ आॅक्टोबर रोजी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित झाले होते. सखुबाई तुराणकर (१०२) यांच्या गरीबीची व अनुसायाबाईचे आपल्या आईवर असलेले प्रेम याबाबतची ती बातमी होती. या वृत्ताची तहसीलदार सचिन कुमावत यांनी दखल घेतली. दोघींनाही शासकीय योजनांचा लाभ मिळवून देवून या मायलेकींच्या जिवनाचा मार्ग सुकर करुन दिला.
सखुबाई तुराणकर यांना श्रावणबाळ योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेतून लाभ देण्यात आला आहे. तर अनुसायाबाई यांचा श्रावण बाळ योजनेसाठी अर्ज भरण्यात आला आहे. संजय गांधी योजनेच्या सभेत समितीसमोर मंजुरीकरित सदर अर्ज सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना ६०० रुपये महिना मिळणार आहे.
भद्रावती तालुक्यातील कोकेवाडा (तु.) येथे सखुबाई अत्यंत द्रारिद्र्य अवस्थेत जीवन जगत असून त्यांना घरकुलसुद्धा नाही. शासकीय योजनांपासून त्या वंचित होत्या. श्रावणबाळ योजनेतून त्यांना ६०० रुपये मिळत होते. परंतु तांत्रिक अडचणीमुळे तेही बंद झाले. त्यांची मुलगी अनुसया भोसकर हिलाही शासकीय योजनांचा लाभ मिळत नव्हता. आईची सेवा करायला कोणी नाही म्हणून घरजावयासोबत आईची काळजी हेच त्यांचे ध्येय होते.
मायलेकीची ही बातमी प्रकाशित होताच तहसीलदार सचिन कुमावत यांनी तलाठी वालोदे यांना कोकेवाडा (तु.) येथे पाठविले आणि चौकशी केली. मागील एक वर्षापासून सदर योजनेचे पैसे सखुबार्इंना मिळत नव्हते. सदर बाबी बँकेचे स्टेटमेंट व त्यांचा अकाऊंट नंबर यावरुन लक्षात आल्या. तत्कालीन तलाठ्यंनी सादर केलेल्या या महिलेबाबतच्या ‘गाव सोडून गेली’ या अहवालातील बाबीमुळे सदर प्रकार घडला होता. संपूर्ण माहिती घेतल्यानंतर तलाठी वालोदे यांनी तहसीलदारांकडे अहवाल सादर केला. त्यानंतर एरिअर्स म्हणून थकबाकी पैकी श्रावणबाळ योजनेतून तीन हजार रुपये सखुबार्इंच्या खात्यात जमा करण्यात आले. तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेतून ५ हजार ६०० रुपयांची उर्वरित रक्कम या महिन्याच्या देयकात पाठविण्यात आली आहे. असे एकूण ८ हजार ६०० रुपये सखुबार्इंना शासकीय योजनेतून मिळणार आहे.