अन् तिला मृत्यूच्या दाढेतून आणले परत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 10:57 PM2019-01-09T22:57:40+5:302019-01-09T22:58:01+5:30
अडीच वर्षापूर्वी एका मातेने गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र या नवजात बाळाला अतिशय दुर्धर आणि दुुर्मिळ आजाराने ग्रासले असल्याचे डॉक्टरांना लक्षात आले. अत्यंत कठीण परिस्थितीत चार तासांची शस्त्रक्रिया पार पडून तिला वाचविण्यात आले. आज ‘परी’ नामक ही मुलगी सुदृढ आयुष्य जगत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अडीच वर्षापूर्वी एका मातेने गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र या नवजात बाळाला अतिशय दुर्धर आणि दुुर्मिळ आजाराने ग्रासले असल्याचे डॉक्टरांना लक्षात आले. अत्यंत कठीण परिस्थितीत चार तासांची शस्त्रक्रिया पार पडून तिला वाचविण्यात आले. आज ‘परी’ नामक ही मुलगी सुदृढ आयुष्य जगत आहे. ही किमया येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. अनुप पालिवाल यांनी साधली. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डा. एस.एस. मोरे, बालरोग तज्ज्ञ डॉ. एम.जे. खान यांनी त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले. विशेष म्हणजे, शस्त्रक्रियेनंतर अडीच वर्ष सदर मुलगी डॉक्टरांच्या निरीक्षणात होती.
परी दिनेश गनोरकर हिचा जन्म ६ मे २०१६ रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे झाला. तिची आई सारिका दिनेश गणोरकर, रा. भादेंवाडी, भोलेनगर, नागपूर येथील रहीवासी असून हे कुटुंब रोज मजुरी करुन आपला उदरनिर्वाह करतात. परीचा जन्म झाल्यावर तिसऱ्या दिवशी तिला अतिदक्षता विभागात भरती केली असता त्या विभागातील विभागप्रमुख डॉ. एम. जे. खान व त्यांचे सहकारी डॉ. मनोज भटनागर, डॉ. सोनारकर व डॉ. राहुल भोंगळे यांनी तिची तपासणी केली. यात परीला गंभीर व दुर्मिळ आजार असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. या आजारात अन्ननलिकेचा प्रवाह पोटात न जाता श्वसनलिकेत जात असतो. अशा परिस्थितीत बाळाने घेतलेले दुध सरळ फुफ्फुसात जात असते. यामुळे फुफ्फुसाचा निगोनिया होण्याचा धोका व बाळाच्या पोटात अन्न न गेल्यामुळे बाळ दगावण्याचा धोका असतो. हा आजार साडेतीन हजार बाळांपैकी एकाला होतो. परीचा जन्म झाला, तेव्हा तिचे वजन १९०० ग्राम होते. अशा परिस्थितीत डॉ. अनुप पालिवाल यांनी बाळावर चार तास शस्त्रक्रिया करुन अन्ननलिकेची नळी पोटाला जोडण्यास यश मिळविले. बाळाला कृत्रिम श्वासाच्या मशिनवर ठेवण्यात आले. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे यांनी बाळाला लागलेल्या प्रत्येक औषधी व वस्तू वैयक्तिक लक्ष घालून उपलब्ध करुन दिले. या कामात अतिदक्षता विभागातील सर्व नर्सिंग स्टॉफ यांनी मोलाचे सहकार्य केले. दरम्यान, ८ जानेवारी २०१९ रोजी परी व तिची आई तपासणीसाठी आली असता परी सुदृढ असल्याचे पाहून डॉ. पालिवाल यांनी समाधान व्यक्त केले. आज परी अडीच वर्षाची झाली आहे.