अन् विद्यार्थी शाळेत पोहोचलेच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 11:12 PM2018-07-10T23:12:01+5:302018-07-10T23:12:26+5:30
गडचांदूर-अंतरगाव- वनोजा, नांदाफाटा-राजुरगुडा, लालगुडा - नांदाफाटा, पिंपळगाव- नांदाफाटा, कढोली- आवारपूर, गडचांदूर -राजुरा आदी मार्गावर लहान नाले व पूल आहेत. संततधार पावसामुळे या पुलावर पाणी आल्याने व काही नाल्यांना पूर आल्याने परिसरातील नांदा, नांदाफाटा, आवारपूर, अंतरगाव आदी गावातील विद्यार्थी मंगळवारी शाळेमध्ये पोहचू शकले नाही. शिक्षकांची मात्र उपस्थिती असल्याने शाळा उघडल्या होत्या. मात्र विद्यार्थी नसल्याने शाळा ओस पडलेल्या दिसल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदाफाटा : गडचांदूर-अंतरगाव- वनोजा, नांदाफाटा-राजुरगुडा, लालगुडा - नांदाफाटा, पिंपळगाव- नांदाफाटा, कढोली- आवारपूर, गडचांदूर -राजुरा आदी मार्गावर लहान नाले व पूल आहेत. संततधार पावसामुळे या पुलावर पाणी आल्याने व काही नाल्यांना पूर आल्याने परिसरातील नांदा, नांदाफाटा, आवारपूर, अंतरगाव आदी गावातील विद्यार्थी मंगळवारी शाळेमध्ये पोहचू शकले नाही. शिक्षकांची मात्र उपस्थिती असल्याने शाळा उघडल्या होत्या. मात्र विद्यार्थी नसल्याने शाळा ओस पडलेल्या दिसल्या.
नांदा परिसरातील राजुरगुडा नाल्यावरील छोट्या पुलावर पाणी असल्याने वाहतूक बंद झाली. तर नांदा-नांदाफाटा मुख्य मार्गावरील दोनही पुलावरून सकाळपासूनच पाणी वाहत होते. त्यामुळे हा मार्गही बंद होता. कढोली-आवारपूर हा मार्ग आधीच दुरवस्थेत असल्याने व तेथील नाल्यावर पुराचे पाणी येईल, या भीतीने विद्यार्थी आलेच नाही. काही शाळांच्या स्कूलबसही पावसामुळे गावात पोहचू शकल्या नाही. पावसाने विजेचा लपंडाव सुरू असून नागरिकांना अंधारातच रात्र काढावी लागली.
भद्रावती तालुक्यात २९ घरांची पडझड
भद्रावती : पावसामुळे भद्रावती तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमधील २९ घरांची पडझड झाली असून अनेकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. तिसऱ्यांदा पुनर्वसन झालेल्या नवीन कुनाडा गावातील १० ते १५ घरांमध्ये पाणी घुसले होते. येथील स्मशानभूमी अजूनही पाण्याने वेढली असून अंत्यसंस्कार कुठे करावे, असा प्रश्न गावकºयांसमोर आहे. वेकोलिने योग्य पुनर्वसन केले नाही. नाल्या बरोबर काढल्या नाही, पुराच्याच जागेवर गावाचे पुनर्वसन केले, असा गावकऱ्यांच्या आरोप आहे. पळसगाव भागातील वेकोलिच्या नवीन खाणीमुळे व तेथील बॅनक वॉटरमुळे शेतात पाणी शिरले. पुरामुळे भद्रावती- माजरी, माजरी-कुचना मार्ग बंद होता.