अन् त्यांना अंत्यदर्शनही घेता आले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 12:39 AM2018-07-02T00:39:53+5:302018-07-02T00:40:57+5:30

सर्वत्र सुख नांदत असताना दुर्दैव केव्हा आणि कसे आड येईल, याचा काही नेम नाही. नियतीची निष्ठूरता कितपत भयावह होऊ शकते, याचा प्रत्यय आज चंद्रपुरात आला. मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने कालेश्वर दर्शनाला निघालेल्या मित्तलवार कुटुंबाच्या नव्या कोऱ्या वाहनाला अपघात झाला ...

And they could not even attend the funeral | अन् त्यांना अंत्यदर्शनही घेता आले नाही

अन् त्यांना अंत्यदर्शनही घेता आले नाही

Next
ठळक मुद्देमित्तलवार कुटुंबावर घाला : संपूर्ण चंद्रपुरात शोककळा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सर्वत्र सुख नांदत असताना दुर्दैव केव्हा आणि कसे आड येईल, याचा काही नेम नाही. नियतीची निष्ठूरता कितपत भयावह होऊ शकते, याचा प्रत्यय आज चंद्रपुरात आला. मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने कालेश्वर दर्शनाला निघालेल्या मित्तलवार कुटुंबाच्या नव्या कोऱ्या वाहनाला अपघात झाला आणि मित्तलवार कुटुंबातील पाच हासते-बोलते सदस्य काळाच्या पडद्याआड नि:शब्द झाले. एकाच कुटुंबातील पाच जणांच्या मृत्यूमुळे संपूर्ण चंद्रपुरात शोककळा पसरली. जे यात बचावले, त्यांचीही अवस्था अशी की त्यांनाही अनंताच्या प्रवासाला निघालेल्यांचे अंतिम दर्शनही घेता आले नाही.
मारोती केशवराव मित्तलवार (६८), लता उर्फ शोभा मारोती मित्तलवार (६५), कमलाकर मारोती मित्तलवार व त्यांची पाच महिन्याची मुलगी श्रीनिका आणि कमलाकर यांचे बंधू संदीप मित्तलवार यांचा दीड वर्षांचा मुलगा सरस असे या दुर्देवी घटनेतील मृतक. हे सर्व चंद्रपुरातील नेहरुनगर येथील रहिवासी.
मारोती मित्तलवार हे गडचांदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत होते. काही वर्षांपूर्वीच ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांना कमलाकर आणि संदीप अशी दोन मुले. कमलाकर मेडीकल रिप्रेझेंटीव्ह म्हणून काम करायचा तर संदीप येथील बजाज तंत्रनिकेतनमध्ये कार्यरत आहे. मित्तलवार कुटुंबीयांनी नवीन कार घेतली. त्यामुळे आज रविवारी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील कालेश्वर येथे दर्शनासाठी जाण्याचा बेत आखला. नवीन कारची पूजाही ते तिथेच करणार होते.
ठरल्याप्रमाणे मारोती मित्तलवार, त्यांच्या पत्नी लता मित्तलवार, कलमाकर मित्तलवार, संदीप मित्तलवार, अर्चना संदीप मित्तलवार, सीमा कमलाकर मित्तलवार, कमलाकर यांची एक वर्षाची मुलगी, संदीप यांचा दीड वर्षांचा मुलगा आणि त्यांच्या बहिणीची १४ वर्षांची मुलगी हे सर्वजण रविवारी सकाळी ६ वाजता कालेश्वरसाठी रवाना झाले. सर्वच आनंदात होते. मात्र नियतीला हे मानवले नाही. गडचिरोली जिल्ह्यातील जिमलगट्टाजवळील गोविंदगाव बसस्थानकाजवळ त्यांचे नवे वाहन एका काळी-पिवळीला धडकले. यात मारोती केशवराव मित्तलवार (६८), लता उर्फ शोभा मारोती मित्तलवार (६५), कमलाकर मारोती मित्तलवार व त्यांची एक वर्षाची मुलगी आणि कमलाकर यांचे बंधू संदीप मित्तलवार यांच्या दीड वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. तर संदीप मित्तलवार, अर्चना संदीप मित्तलवार, सीमा कमलाकर मित्तलवार हे गंभीररित्या जखमी झाले. कुणाचे हात तुटले तर कुणाचे पाय. या घटनेची वार्ता चंद्रपुरात पोहचताच एकच खळबळ उडाली.
सर्वांनीच नेहरुनगरातील त्यांच्या घराकडे धाव घेतली. एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू सर्वांना जबर हादरा देऊन गेला. घटनेतील सर्व जखमींना चंद्रपुरात आणल्यानंतर जिल्ह सामान्य रुग्णालयात एकच गर्दी उसळली.
यावेळी उपस्थित नातलग व मित्तलवार कुटुंबांशी जुळलेल्या सर्वांचेच अश्रू अनावर झाले होते. विशेष म्हणजे, या घटनेत जे मृत पावले त्यांचे मृतदेह गडचिरोली जिल्ह्यातील रुग्णालयात होते. तिथेच त्याचे शवविच्छेदन झाले.
चंद्रपुरात उपचारार्थ दाखल मित्तलवार कुटुंबातील जखमी सदस्यांची अवस्था बघून त्यांना त्यांच्या कुटुंबातील पाच सदस्य मृत पावले, हे सांगण्याचे धाडस कुणालाही झाले नाही. तशीच त्यांची अवस्था असल्याने ते संयुक्तिकही होते. मात्र यामुळे उपस्थितांचे डोळ्यातील अश्रू अनावर झाले होते.
रुग्णालयात उसळली गर्दी
या घटनेची माहिती चंद्रपुरात येताच सर्वत्र शोककळा पसरली. संपूर्ण प्रभागात आणि त्यानंतर शहरात या घटनेचीच चर्चा केली जात होती. सोशल मीडियावरूनही ही माहिती सर्वत्र पसरली. जेव्हा जखमींना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले, तेव्हा रुग्णालयात मित्तलवार कुटुंबीयांचे नातलग, त्यांचे मित्र, सहकारी आणि नागरिकांनी एकच गर्दी केली.
घराचे कुलूप तोडून नातलगांची व्यवस्था
मित्तलवार कुटुंबातील पाच सदस्यांचा मृत्यू आणि इतर सदस्य गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल असल्याने नेहरुनगरातील त्यांचे घर रविवारी कुलूपबंद होते. मात्र मित्तलवार यांचे नातलग चंद्रपुरात पोहचू लागल्याने त्या प्रभागाचे नगरसेवक सुरेश पचारे यांनी आपल्या सहकाºयांनी घेऊन आधी जिल्हा सामान्य रुग्णालयत गाठले. तिथे जखमींची विचारपूस केल्यानंतर त्यांनी नेहरूनगरातील मित्तलवार यांचे घराचे दार उघडून नातलगांना घर मोकळे करून दिले.

Web Title: And they could not even attend the funeral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.