अन् ‘येडा अण्णा’ विव्हळत होता; चंद्रपूरचे वाघ मृत्यू प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:02 PM2018-02-27T12:02:01+5:302018-02-27T12:02:08+5:30
वनविभाग कायदेशीवर कार्यवाही करीत होता आणि तिकडे ताडोबात ‘येडा अण्णा’ नावाने प्रसिद्ध असलेला वाघ जखमांनी विव्हळत होता.
राजेश भोजेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : नॅशनल टायगर कन्झर्वेशन आॅफ अॅथारिटी (एनटीसीए)च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जखमी वाघावर उपचार करण्यासाठी समिती गठन करणे बंधनकारक आहे. समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारेच वाघाला सुन्न करून उपचार केले जातात. वनविभाग ही कायदेशीवर कार्यवाही करीत होता आणि तिकडे ताडोबात ‘येडा अण्णा’ नावाने प्रसिद्ध असलेला वाघ जखमांनी विव्हळत होता. रविवारी सकाळी समितीने अहवाल तयार करून उपचाराची परवानगी मिळविली खरी. परंतु अवघ्या दोन तासांनीच ‘येड्या अण्णा’ने जगाचा निरोप घेतला. आता वनविभाग आणि वन्यजीव रक्षक सारवासारव करीत असल्याचे दिसून येत आहे.
वाघाच्या शवविच्छेदनाचा अहवाल नॅशनल टायगर कन्झर्वेशन आॅफ अॅथारिटी (एनटीसीए)ला पाठविला आहे. त्याच्या शरीरावरील जखमा खोलवर होत्या. जखमांना अळ्या लागलेल्या होत्या, अशी माहिती पुढे आली आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या ‘येडा अण्णा’ नावाच्या या वाघाचा वनविभागाच्या डोळ्यादेखत झालेल्या मृत्यूने पर्यटकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. एक वाघ २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चिमूर वनपरिक्षेत्रातील भान्सुली बिटातील तलावाजवळ असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. वनविभागाने दुसऱ्या दिवशी हालचाली केल्या. वाघ आणि मनुष्य संघर्षाचा अनुभव बघता तेथे कोणतीही अनुचित घटना घडू नये, याची खबरदारी म्हणून सुमारे ४० वनकर्मचाऱ्यांचा पहारा देण्यात आला. २३ फेब्रुवारी रोजी चंद्रपूरहून मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांनी घटनास्थळाला भेट दिली. वाघाला उपचाराची गरज असल्याची बाब त्यांच्या लक्षात येताच त्यांनी तसा अहवाल एनटीसीएला पाठविला.
शेळके यांच्या अहवालानुसार २४ फेब्रुवारी रोजी समितीचे गठण करण्यात आले. समिती दुसऱ्या दिवशी म्हणजेच २५ फेब्रुवारी सकाळी १० वाजता घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर समितीने वाघाला उपचाराची गरज असल्याचा अहवाल एनटीसीएला व्हॉट्सअॅपवरून पाठविला. लगेच वाघाला सुन्न करण्याचे इंजेक्शन देण्यासाठी व त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यासाठी नऊ जणांचे पथक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह दुपारी १ वाजता घटनास्थळी हजर झाले. मात्र वाघ निपचित पडून होता. त्याची चौकशी केली असता सुमारे अर्ध्या तासापूर्वीच त्याने जगाचा निरोप घेतला होता, असे वनविभागाच्या सूत्राने सांगितले. या घटनाक्रमारून वन अधिकारी एनटीसीएच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात व्यस्त होते आणि दुसरीकडे ‘येडा अण्णा’ जखमांनी विव्हळत होता. यात ‘येडा अण्णा’चा काय दोष, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
वाघ हा शेड्युल वनमध्ये मोडणारा प्राणी असल्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी एनटीसीएचे काही नियम आहेत. त्याचे पालन करणे गरजेचे होते. २२ फेब्रुवारीला वाघाला पहिल्यांदा पाहिले. २३ ला स्वत: जाऊन पाहणी केली. त्यानुसार उपचाराची गरज असल्याचा अहवाल एनटीसीएला पाठविला. याआधारे २४ तारखेला समितीचे गठ न केले. त्या दिवशी ही समिती न येता ती २५ ला सकाळी आली. समितीच्या अहवालानंतर नऊ जणांची चमू घटनास्थळी दाखल झाली. मात्र वाघाचा मृत्यू झाला होता.
- विजय शेळके
मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर.
गंभीर स्वरुपाच्या जखमी वाघाला उपचाराकरिता रेस्क्यू करण्यासंदर्भात त्वरित आणि जलद निर्णय घेण्याची गरज आहे. हे या घटनेने स्पष्ट होते. या संदर्भात एनटीसीएकडे पाठपुरावा करण्यात येईल.
- बंडू धोतरे, मानद वन्यजीव रक्षक, चंद्रपूर.