अंगणवाडी सेविकांची दिवाळी अंधारात
By admin | Published: October 24, 2015 12:33 AM2015-10-24T00:33:21+5:302015-10-24T00:33:21+5:30
शासनाच्या एकात्मिक बाल व महिला विकास प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची यावर्षीची दिवाळी मानधनाअभावी अंधारात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
भाऊबीज भेटीलाही खो : चार महिन्यांपासून मानधन नाही
माजरी : शासनाच्या एकात्मिक बाल व महिला विकास प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची यावर्षीची दिवाळी मानधनाअभावी अंधारात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
भद्रावती तालुक्यातील बहुतांश अंगणवाडी सेविका व त्यांच्या मदतनीस यांचे सहा महिन्यापासून मानधन मिळाले नाही. दरवर्षी दिवाळीनिमित्त मिळणारी भाऊबिज भेटही वाटप झाली नाही. यामुळे दिवाळी कशी जाणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात नेते पुढारी यांनी प्रचाराच्या वेळी जनतेला ‘अच्छे दिन’ चे स्वप्न दाखविले आणि सत्तेत बसताच दिलेल्या आश्वासनांचा सर्वांनाच विसर पडला असल्याचा आरोप होत आहे.
२४ तास सेवा देणाऱ्या या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मानधन व भेट वितरण वेळेवर होत नाही. सरकारी निधी उपलब्ध करुन देण्यात विलंब होत आहे. या गरीब महिलांवर उपासमारीची पाळी आली आहे तर दुसरीकडे सरकारी कर्मचारी, अधिकारी यांना वेतन व दिवाळी भेट नियोजित काळातच वाटप करण्यात येते. मात्र प्रत्यक्ष घरोघरी फिरुन व अंगणवाडी केंद्रात रोज सेवा देणाऱ्या या होतकरु महिलांना वेळेवर मानधन मिळत नाही. यालाच ‘अच्छे दिन’ म्हणावे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)