अंगणवाडी सेविकांचे जि.प. समोर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 01:28 AM2018-03-17T01:28:17+5:302018-03-17T01:28:17+5:30
राज्यातील दहा हजार अंगणवाडी सेविका, मदतनिस आणि मिनी अंगणवाडी सेविकांची भरती प्रक्रिया बंद करणे, सेवानिवृत्तीचे वय ६५ ते ६० करून १ एप्रिल २०१८ पासून १३ हजार ७०० अंगणवाडी सेविकांना सेवेतून कमी करण्याचा डाव रचला जात असल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी जि. प. समोर आंदोलन करण्यात आले.
ऑनलाईन लोकमत
चंद्रपूर : राज्यातील दहा हजार अंगणवाडी सेविका, मदतनिस आणि मिनी अंगणवाडी सेविकांची भरती प्रक्रिया बंद करणे, सेवानिवृत्तीचे वय ६५ ते ६० करून १ एप्रिल २०१८ पासून १३ हजार ७०० अंगणवाडी सेविकांना सेवेतून कमी करण्याचा डाव रचला जात असल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी जि. प. समोर आंदोलन करण्यात आले.
राज्य सरकारने अंगणवाडी महिलांच्या हिताचे धोरण न राबविता अन्यायकारक आदेश काढून अडचणी वाढवित असल्याचा आरोप अंगणवाडी सेविकांनी केला. सेवानिवृत्तीसाठी साठ वर्षांची अट लागू करणारा जी.आर. रद्द करा, अंगणवाडी महिलांच्या रिक्त जागा तत्काळ भरा, अंगणवाडी महिलांना सेवानिवृत्तीचा लाभ द्या, आदी मागण्यांवरून अंगणवाडी सेविकांनी जोरदार घोषणाबाजी केली. अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन करताना प्रा. रमेशचंद्र दहिवडे म्हणाले, ‘अच्छे दिन’ च्या नावाखाली सरकारने शोषित घटकांवर अन्याय सुरू केला आहे. विविध कल्याणकारी योजना गुंडाळण्याच्या हालचाली सरकारने सुरू केल्या आहेत. या अन्यायाविरुद्ध सर्व घटकांनी लोकशाही मार्गाने विरोध केला पाहिजे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
दरम्यान, शिष्टमंडळाचे वतीने मुख्य कार्यपालन अधिकारी जितेंद्र पापडकर तसेच उपमुख्याधिकारी संजय जोल्हे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात ३५ मागण्यांचा समावेश होता. या मोर्चात सुरेखा तितरे, प्रणीता लांडगे, पवित्रा ताकसांडे, शोभा बोगावार, वर्षा तिजारे, वंदना जीवने, रेखा ढेंगळे, कुंदा वाघमारे, ललीता चौधरी, वैशाली बोकारे, वंदना मुळे, रेखा रामटेके, सिंधू मगरे, उर्मिला नगराळे, सुशीला कर्णेवार, लता अहीरकर, गुजाबाई डोंगे, संगीता देशमुख, विद्या निब्रड, बंडू पहानपटे आदींसह बहुसंख्य अंगणवाडी सेविकांचा सहभाग होता.