अंगणवाड्या संस्कार केंद्र व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2016 02:00 AM2016-05-26T02:00:26+5:302016-05-26T02:00:26+5:30
मुलांवर संस्कार करण्याचे काम अंगणवाड्यांच्या माध्यमातून होत असते. कोवळी पिढी घडविण्यच्या कामाची सुरूवातच
पंकजा मुंडे : दोन हजार अंगणवाड्यांना मिळाले रेडिओ स्पिकर
चंद्रपूर : मुलांवर संस्कार करण्याचे काम अंगणवाड्यांच्या माध्यमातून होत असते. कोवळी पिढी घडविण्यच्या कामाची सुरूवातच अंगणवाड्यांमधून होत असल्याने राज्यातील सर्व अंगणवाड्यांना स्मार्ट करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. मुलांसोबतच गर्भवती महिला व स्तनदा मातांना संस्कारित करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका व मदतनिसांवर आहे. अंगणवाडया संस्काराचे केंद्र व्हावे व बालमनाला आकार देण्याचे काम आपण समर्पणाने करावे असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद व पावर ग्रीड कापोर्रेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंगणवाडी सेविकाकरिता कार्यशाळा व अंगणवाडी केंद्राना ट्रॉन्झिस्टर वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार होते तर प्रमुख पाहुणे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, खासदार अशोक नेते, आमदार नाना शामकुळे, संजय धोटे, बंटी भांगडिया, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे, उपाध्यक्ष कल्पना बोरकर, सभापती सरिता कुडे, देवराव भोंगळे, ईश्वर मेश्राम, पॉवर ग्रिडचे महाव्यवस्थापक एस.के .डंभारे, उपमहाव्यवस्थापक संजय वर्मा, श्री.के.प् ाालनिप्पन व उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपूल जाधव यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमात मंत्र्यांच्या हस्ते रेडिओ व स्पिकरचे वितरण करण्यात आले. आकाशवाणी कार्यक्रमाची झलक या सिडीचे विमोचन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना ना. मुंडे म्हणाल्या, राज्यातील अंगणवाड्या स्मार्ट करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून पुढील दोन वर्षात सर्व अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत उपलब्ध करुन देण्यात येईल. अंगणवाडयांमध्ये दृकश्राव्य माध्यमांचा वापर करुन अभ्यासक्रम तयार करण्यात येणार असून शिक्षणासोबतच स्वच्छता अभियान, पर्यावरणाचे रक्षण, परसबाग संकल्पना, वृक्ष लागवड व शौचालय आदी बाबी यात समाविष्ट करण्यात येतील. म्हणूनच रेडिओ वाटपानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे अंगणवाड्यांना दूरदर्शन संच देण्याचा असणार आहे.
शून्य ते सहा वर्ष वयोगटाच्या मुलांवरील संस्कार हीच देशाची संपत्ती असून आकाशवाणीच्या माध्यमातून जिल्हयातील दोन हजार अंगणवाड्यांमध्ये संस्कार करण्याचे काम केले जाणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. प्रत्येक अंगणवाडी व शाळा आदर्श करण्याचा संकल्प केला असून जिल्ह्यातील ६०० शाळा ई-लर्निंग करण्यात येतील. दर आठवड्याला आकाशवाणीचा एक तासाचा कार्यक्रम खास अंगणवाड्यसाठी सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ना. मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नाने पावर ग्रीड या कंपनीच्या सी.एस.आर. निधीमधून दोन हजार अंगणवाड्यांना रेडिओ व स्पिकर्स देण्यात आले. आकाशवाणी चंद्रपूरच्या माध्यमातून प्रत्येक आठवडयात एक ते दोन तासाच्या कालावधीत अंगणवाडीतील बालकांसाठी, गरोदर माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुली यांच्यासाठी जागृतीपर कार्यक्रम प्रसारीत करण्यात येणार आहेत. सदर कार्यक्रमासाठी यशदा पुणे येथील तज्ञ तसेच राज्यातील इतर तज्ज्ञ मार्गदर्शकांची मदत घेण्यात येईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक सिरसे यांनी तर संचालन शीला जुमडे यांनी केले. कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (जिल्हा प्रतिनिधी)
मानधन वाढीची फाईल मंजूर - मुंडे
ना. पंकजा मुंडे म्हणाल्या, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सर्वसोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. अर्थमंत्र्यांच्या प्रयत्नाने अनेक वर्ष प्रलंबित असलेली मानधन वाढीची फाईल मंजूर झाली आहे. आदर्श अंगणवाडी तयार करण्यासाठी सोयीसुविधांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सेविका व मदतनीस यांचे मानधनासह सर्व प्रश्न सोडविण्यासाठी आपले सरकार कटिबध्द आहे.