अंगणवाडीताईंचे मोबाईल निघाले निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:31 AM2021-08-19T04:31:40+5:302021-08-19T04:31:40+5:30
चिमूर (चंद्रपूर) : अंगणवाडीतील मुलांची माहिती, स्तनदा गर्भवती मातांची माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्यात आले. हे मोबाईल ...
चिमूर (चंद्रपूर) : अंगणवाडीतील मुलांची माहिती, स्तनदा गर्भवती मातांची माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्यात आले. हे मोबाईल सतत हँग होत आहेत. यात माहिती अद्ययावत करताना अडचणी येत असल्याने अखेर त्रस्त झालेल्या चिमूर तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी हे मोबाईलच शासनाला परत दिले आहेत. दर्जेदार मोबाईलची मागणी या अंगणवाडी सेविकांनी केली आहे. चिमूर तालुक्यातील २४५ अंगणवाडी सेविकांनी त्यांचे निकृष्ट दर्जाचे मोबाईल एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी पूनम गेडाम यांच्याकडे परत दिले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने अंगणवाडी कृती समितीच्यावतीने पोषण ट्रेकर इंग्रजीत भरण्याची सक्ती अंगणवाडी सेविकांना करता येणार नाही. त्यामुळे त्यांच्या मानधनात कपात करता येत नाही, असा निर्णय दिला आहे. मोबाईलवर काम करणाऱ्या सेविका, मदतनीस यांना देण्यात येणारा २५० व ५०० रुपये प्रोत्साहन भत्ता मिळवण्यासाठी प्रचंड अनियमितता आहे. हा भत्ता वाढविण्यात यावा. सेविकांच्या रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्यात आदी मागण्या घेऊन मंगळवारी शेकडो अंगणवाडीताई चिमूर येथील एकात्मिक बालविकास प्रकल्पावर धडकल्या होत्या. पोषण अभियान कार्यक्रमांर्गत सन २०१९ मध्ये राज्यातील १ लाख ५ हजार ५९२ अंगणवाडी सेविकांना शासकीय कामासाठी मोबाईल वाटप करण्यात आले होते. या मोबाईलचा वॉरंटी कालावधी दोन वर्षांचा होता. हा कालावधी मे २०२१ मध्ये संपला. तर मोबाईलच्या माध्यमातून लाभार्थ्यांची नावे, हजेरी, वजन, उंची, स्तनदा व गर्भवती मातांची माहिती, पोषण आहाराचे वाटप अशी सविस्तर माहिती मोबाईलमधून भरण्यात येते. परंतु या मोबाईलची क्षमता (रॅम) केवळ २ जीबी असल्याने माहिती भरताना मोबाईल हँग होत आहे. मोबाईल गरम होत आहेत. त्यामुळे मोबाईल फुटण्याची मोठी भीती व्यक्त करून परत करण्यात आले. आंदोलनावेळी अंगणवाडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र)चे जिल्हाध्यक्ष इम्रान कुरेशी, माधरी वीर, इंदिरा आत्राम, सुनीता भोपे, वैशाली ढोक, अर्चना सोनवणे, करुणा गुरनुले, सविता बोरकर, शोभा गोडे आदी उपस्थित होते.
180821\img-20210817-wa0211.jpg
चिमुर येथील मोबाईल वापसी आंदोलन दरम्यान उपस्थित संघटनेचे जिल्हाध्यक्ष इम्रान कुरेशी,अंगणवाडी सेविका,प्रकल्प अधिकारी पूनम गेडाम यांना निवेदन देताना