पहाडावरील आदिवासींसाठी ‘अर्थ’ ठरतेय देवदूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 12:21 AM2017-11-08T00:21:22+5:302017-11-08T00:21:33+5:30
अर्थ (एज्युकेशन अॅक्शन रिसर्च इन ट्रायबल हेल्थ) ही संस्था सध्या जिवती तालुक्यातील आदिवासींच्या आरोग्य विकासावर कार्य करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : अर्थ (एज्युकेशन अॅक्शन रिसर्च इन ट्रायबल हेल्थ) ही संस्था सध्या जिवती तालुक्यातील आदिवासींच्या आरोग्य विकासावर कार्य करीत आहे. त्यामुळे ही संस्था आदिवासींसाठी देवदुतच ठरत असल्याची प्रतिक्रिया अनेकांकडून ऐकायला मिळत आहे.
या संस्थेचे संचालक डॉ. कुलभूषण मोरे हे मुळचे जिवती तालुक्यातील असल्यामुळे येथील आदिवासी लोकांच्या आरोग्याच्या समस्या त्यांना माहित आहेत. हा भाग डोंगराळ व अतिदुर्गम असून अनेक आदिवासी गुडे रस्त्याअभावी दुर्लक्षीत आहेत. त्यामुळे या गावात आरोग्याच्या अनेक समस्या आहेत.
दूषित पाणी, कुपोषण, मलेरिया, त्वचारोग, क्षयरोग, साथीचे आजार यासोबतच सामाजिक आणि मानसिक आजार या आदिवासींच्या सर्व गोष्टी डॉ. कुलभूषण मोरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आशियातील सर्वोच्च असलेली राष्टÑीय ग्रामीण विकास संस्था हैदराबाद येथे पी. जी. इन ट्रायबल डेव्हलपमेंट हा जिवती येथील भागाचा संशोधन अभ्यासक्रम पूर्ण केला. यातून त्यांनी अर्थ संस्थेची १ आॅक्टोबर २०१३ ला स्थापना केली.
अर्थच्या माध्यमातून आदिवासी गावात आरोग्य शिक्षण देणे, आरोग्याच्या प्रश्नांवर कृती आराखडा तयार करणे, त्यातून आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्य करून आरोग्याच्या बाबतीत संशोधण करणे आणि उपायोजन करणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे.
याचसोबत येथील लोकांना स्वच्छता व आहाराबद्दल जनजागृती करणे, पाणी उकडून पिणे, रोज आंघोळ करणे, व्यसन न करणे, सकस आहार घेणे, व्यसनांचे दुष्परिणाम, गरोदर माता व स्तनदा मातांना आहारबद्दल माहिती व दवाखान्यात प्रसुती करण्याबद्दल प्रेरीत करणे अशा सर्व बाबींवर जनजागृती, संस्थेकडून केली जात असल्याने आदिवासी जागृत होत आहेत.
अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार
डॉ. कुलभूषण मोरे यांची अर्थ संस्था जिवतीसारख्या अतिदुर्गम भागात आदिवासींसाठी चांगले कार्य करते. या त्यांच्या कार्याबद्दल डॉ. मोरे यांना या वर्षीचा अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार नागपूर येथे प्रदान करण्यात आला.
आजपर्यंत आदिवासी गावात ‘अर्थ’ संस्थेने आरोग्य विभागाच्या सहकार्याने अनेक आरोग्य शिबिरे घेतली आहे. दंतरोग, त्वचारोग किंवा इतर अन्य आजारांवर ४०० ते ५०० लोकांना मोफत औषधोपचार झाला आहे. यासाठी इतर अनेक डॉक्टरांची मदत घेतली जाते. हे सर्व करीत असताना आई-वडील व पत्नी डॉ. नंदीनी मोरे यांचे आपणास नेहमी सहकार्य मिळते.
- डॉ. कुलभूषण मोरे
अध्यक्ष, अर्थ संस्था, जिवती.