संतप्त ग्रामस्थांचा आक्रोश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 01:11 AM2018-11-14T01:11:01+5:302018-11-14T01:13:18+5:30
आता रडायचे नाही, तर आपल्या न्याय हक्कासाठी लढायचे हे ब्रिद घेऊन देवाडा खुर्द येथील कष्टकरी, निराधार व बेरोजगारांच्या न्याय हक्कासाठी मंगळवारी देवाडा खुर्दवासीयांचा कुटुंबासह बैल -बंडी, गुरे ढोरे घेऊन आक्रोश मोर्चा तहसील कचेरीवर धडकला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पोभूर्णा : आता रडायचे नाही, तर आपल्या न्याय हक्कासाठी लढायचे हे ब्रिद घेऊन देवाडा खुर्द येथील कष्टकरी, निराधार व बेरोजगारांच्या न्याय हक्कासाठी मंगळवारी देवाडा खुर्दवासीयांचा कुटुंबासह बैल -बंडी, गुरे ढोरे घेऊन आक्रोश मोर्चा तहसील कचेरीवर धडकला.
डॉ. आंबेडकर चौक ते तहसील कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चात देवाडा खुर्द येथील नागरिकांची हजारोच्या संख्येने उपस्थिती होती. पोंभूर्णा तालुक्यातील सर्वात मोठे महसुली गाव म्हणून देवाडा खुर्द गावाचा विचार होतो. मात्र हे गाव शासकीय सोयी सवलती, योजना व विकासापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले जात असल्याचा गंभीर आरोप गांवकऱ्यांनी केला आहे.
मौजा रामपूर दीक्षित, कोसंबी रिठ येथील सार्वजनिक प्रयोजनार्थ ठेवलेली जागा महसूल अधिकाºयांनी चिरीमिरी घेऊन पट्टे स्वरुपात दिली. हे पट्टे त्वरित रद्द करून ती जमीन शासन जमा करण्यात यावी, बोगस व धनदांडग्या अतिक्रमणधारकावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, गावाच्या निस्तार हक्काची जागा गोठविणारे तत्कालीन उपविभागिय अधिकारी चंद्रभान पराते यांची मालमत्ता व आर्थिक परिस्थितीची चौकशी करण्यात यावी, महसुली अभिलेखात खोडतोड करून नव्याने अभिलेखात नोंद करणाऱ्या अभिलेख प्रमुखावर प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी, गावातील गुरे-ढोरे चराईच्या जमिनीवर अतिक्रमण करून वन संपदा नष्ट करणाऱ्या महसुली अधिकाºयावर कार्यवाही करण्यात यावी, चालु आर्थिक वर्षात अंधारी नदीवर बंधारा बांधून सिंचनाची समस्या तात्काळ मार्गी लावावी यासह अनेक शेतकरी हिताच्या मागण्या यावेळी मोर्चेकरांनी लावून धरण्यात आल्या.
यावेळी बल्लारपूरचे जेष्ट सामाजिक कार्यकर्ते पवन भगत, पोंभूर्णा तालुका कॉंग्रेस कमिटीचे ओमेश्वर पद्मगिरीवार, युवा सेनेचे उप जिल्हा प्रमुख आशिष कावटवार, पोंभूर्णा शिवसेना नेते गणेश वासलवार, देवाडा खुर्दचे सरपंच विलास मोगरकार, राजू झोडे, निलकंठ नैताम यांनी यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. मोर्चात महिला, पुरूष, बेरोजगारांची हजारोच्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान, कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता.
तहसीलदारांच्या अनुपस्थितीमुळे तणाव
शेतकºयांची पाळीव जनावरे, बैल-बंड्या व महिलांच्या लाक्षणिक उपस्थितीमुळे या मोर्चाने पोंभूर्ण्यातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी तहसील कार्यालयात तहसीलदार उपस्थित नव्हते. मात्र मोर्चेकरांनी तहसीलदारांचीच भेट घेण्याचा हट्ट धरल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करीत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे कोणताच अनुचित प्रकार घडला नाही.