पिण्याच्या पाण्यासाठी संतप्त महिलांनी रोखला ताडोबा मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 06:40 PM2024-05-16T18:40:58+5:302024-05-16T18:41:25+5:30
१५ महिला स्थानबद्ध : मनपाला कुलूप ठोकण्याचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरातील सुमित्रा नगर परिसरातील नागरिकांना मनपाच्या अमृत नळयोजनेचे पाणीच मिळत नसल्याने संतप्त महिलांनी बुधवारी सकाळी १० वाजता खत्री महाविद्यालयासमोर ताडोबाचा मार्ग दोन तास रोखून धरला. या आंदोलनामुळे मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी १५ महिलांना स्थानबद्ध करून काही वेळाने सोडून दिले.
महानगरपालिकेतर्फे अमृत योजनेंतर्गत तीन वर्षांपासून पाणीपुरवठा जोडणी सुरू आहे. पण, सुमित्रा नगर परिसरात जोडणी झाली नाही. या भागात पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाण्याची समस्या तात्काळ निकाली काढावी, या मागणीसाठी प्रभागातील महिला एकत्र आल्या. त्यांनी खत्री महाविद्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करून ताडोबा मार्ग रोखून धरला. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या. अखेर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढली. पण, ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्यांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. दोन तासांनंतर ताडोबा मार्ग पूर्ववत सुरू झाला. सुमित्रा नगर परिसरात पाणीपुरवठा नियमित झाला नाही तर मनपाला कुलूप ठोकण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. या आंदोलनात माजी नगरसेवक सुभाष कासनगोदूवार, मंजुश्री कासनगोदूवार, प्रज्ञा गंधेवार, वसंत धंदरे, विजय चिताडे, माया ऊईके, आशिष ताजने, रंजीत मातंगी, आशिष बोंडे, अभिषेक सिंग, ललिता बावनथडे, दीपा नागरीकर आदी सहभागी झाले होते.