संतप्त महिलांनी केला चंद्रपूरच्या आमदाराचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 11:10 PM2019-06-26T23:10:29+5:302019-06-26T23:10:47+5:30
येथील क्राईस्ट रुग्णालय परिसरात असलेल्या खुल्या जागेवर झोपडी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर आमदार नाना श्यामकुळे यांनी पोलिसांना सांगून आपल्यावर लाठीमार केला. एवढेच नाही तर झोपड्या उद्ध्वस्त केल्या. यामुळे संतप्त झालेल्या येथील काही महिलांनी तुकूम परिसरात एकत्र येत आ. नाना श्यामकुळे यांचा निषेध केला. या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येथील क्राईस्ट रुग्णालय परिसरात असलेल्या खुल्या जागेवर झोपडी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर आमदार नाना श्यामकुळे यांनी पोलिसांना सांगून आपल्यावर लाठीमार केला. एवढेच नाही तर झोपड्या उद्ध्वस्त केल्या. यामुळे संतप्त झालेल्या येथील काही महिलांनी तुकूम परिसरात एकत्र येत आ. नाना श्यामकुळे यांचा निषेध केला. या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले आहे.
तुकूम परिसरात असलेल्या क्राईस्ट हॉस्पिटलसमोर खुल्या जागेची स्वच्छता करून त्याच परिसरात राहणाऱ्या काही महिलांनी २३ जून रोजी झोपड्या बांधण्याचा प्रयत्न केला. यानंतर तत्काळ पोलिसांनी येऊन या महिलांना थांबवित लाठीचार्ज केला.
यानंतर स्थानिक ख्रिस्ती नागरिकांनी या खुल्या जागेवर कब्रस्तनासाठी राखीव जागा, असा फलक लावला. मात्र झालेला लाठीचार्ज आमदार नाना श्यामकुळे यांच्या सांगण्यावरूनच करण्यात आला, असा आरोप या महिलांनी करून बुधवारी तुकूम परिसरातील डॉ. धांडे हॉस्पिटल परिसरामध्ये मंडप टाकून निषेध नोंदविला. आमदार नाना श्यामकुळे यांच्या निषेधाचा फलकही मंडपात लावण्यात आला होता.
लाठीमार केल्याचा आरोप निराधार - श्यामकुळे
या अतिक्रमणाबाबत आपल्याला माहिती मिळाली असता पोलीस अधिक्षकांना भ्रमणध्वनीद्वारे नियमाप्रमाणे कार्यवाही करावी, असे आपण सुचित केले. मी केवळ आमदार आहे. पोलीस विभाग वस्तुस्थितीची माहिती घेवूनच कार्यवाही करतात. त्यामुळे माझ्या म्हणण्यानुसार पोलीस विभाग निश्चितच लाठीमार करणार नाही, असे आ. नाना श्यामकुळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. माझ्यावर जो आरोप करण्यात आला आहे. तो खोटा व निराधार असून यामागे निश्चितपणे राजकीय षडयंत्र आहे, असेही आ. श्यामकुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.