राजुऱ्यात संतप्त महिलांचा आक्रोश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 11:47 PM2019-04-18T23:47:30+5:302019-04-18T23:50:24+5:30
इन्फंट जिजस सोसायटीच्या वसतिगृहातील लैंगिक शोषण प्रकरणाबाबत समाजात आणखी रोष वाढत आहे. विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करावी, प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी व्हावी, या व इतर मागण्यांसाठी आज राजुऱ्यात आदिवासी महिलांनी महाआक्रोश मोर्चा काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : इन्फंट जिजस सोसायटीच्या वसतिगृहातील लैंगिक शोषण प्रकरणाबाबत समाजात आणखी रोष वाढत आहे. विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करावी, प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी व्हावी, या व इतर मागण्यांसाठी आज राजुऱ्यात आदिवासी महिलांनी महाआक्रोश मोर्चा काढला. सोबतच राजुऱ्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.
राजुरा शहरातील पंचायत समिती चौकातून निघालेल्या मोर्चा भारत चौक, गाध्ांी चौक, नेहरू चौक मार्गे जुने बसस्थानकावरून मार्गक्रमण करीत पुढे निघाला. आदिवासी समाजाच्या या विराट महाआक्रोश मोर्चाचे नेतृत्व आदिवासी समाजाचे नेते जिल्हा परिषद सदस्य गोदरू जुमनाके, प्रमोद बोरीकर, बापुराव मडावी, भिमराव मडावी, निळकंठ कोरांगे, जिवतीचे पंचायत समिती सभापती सुनील मडावी, मनोज आत्राम, भारत आत्राम, भिमराव मेश्राम, ओजी आत्राम, क्रिष्णा मसराम, चंद्रकला सोयाम, संभा कुमरे, वाघु गेडाम, शामराव गेडाम, तुकाराम सिडाम, आनंदराव कोटनाके यांनी केले. मोर्चा जिल्हा परिषद विद्यालयात पोहचल्यानंतर तिथे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. सभेत मंचावर राजकीय पक्षांचे नेते बसले होते. मात्र प्रकरणात राजकारण शिरू नये म्हणून त्यांना तिथून हटवून मोर्चातील महिलांना मंचावर बसविले.
पंचायत समिती चौकात रास्तारोको
मोर्चा झाल्यानंतर सायंकाळी पंचायत समिती चौकात काही महिलांनी रास्तारोको केला. त्यामुळे या मार्गावर वाहतूक काही वेळ ठप्प पडली. मात्र पोलिसांनी घटनास्थळी येऊन महिलांना ताब्यात घेऊन रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर ताब्यात घेतलेल्या महिलांना सोडून देण्यात आले.
सामजिक संस्थेकडून
पाणी वाटप
भर उन्हात निघालेल्या मोर्चेकऱ्यांसाठी नेहरू चौक मित्र मंडळ, राजुरा, भारतीय जनता पक्ष राजुरा, विश्वहिंदू परिषद, बजरंग दल यांच्या तर्फे पाण्याची व्यवस्था करण्यात आली. रूपेश भाकरे, सचिन भटारकर, विनय आक्केवार, अंकुश घाटोळे यांनी पाणी वाटपात सक्रीय भाग घेतला.
राजुरा येथील शाळकरी मुलीचे लैंगिक शोषण ही बाब अतिशय घृणास्पद आहे. या नामांकित वसतिगृहाची मान्यता काढली असून पुढे कडक कारवाई करण्यासाठी मागणी करणार आहे.
-डॉ. अशोक उईके,
आमदार, राळेगाव तथा अध्यक्ष
आदिवासी विधीमंडळ कल्याण समिती