आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुरू झाली पशुगणना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 03:14 PM2024-11-26T15:14:38+5:302024-11-26T15:16:53+5:30

मोबाइल अॅपचा वापर : प्रगणक घेताहेत पणूंची जाती व लिंगनिहाय नोंदी

Animal census started with the help of modern technology | आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुरू झाली पशुगणना

Animal census started with the help of modern technology

लोकमत न्यूज नेटवर्क 
चंद्रपूर :
२१व्या पंचवार्षिक पशुगणनेला जिल्ह्यात सोमवारपासून (दि. २५) सुरुवात करण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत मोबाइल अॅपच्या माध्यमातून ही पशुगणना केली जात आहे. पशुपालकांनी पशुगणना करण्यासाठी येणाऱ्या प्रगणकांना आपल्याकडील पशुंची अचूक व योग्य माहिती देण्यात यावी, असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले.


पशुगणनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रनिहाय कुटुंब, कौटुंबिक उपक्रम, बिगर कौटुंबिक उपक्रम आणि संस्था, गोशाळा यांच्याकडे असलेल्या १६ पशुधन प्रजाती व कुक्कुट पक्षी यांची जातीनिहाय, वयोगट तसेच लिंगनिहाय आकडेवारी गोळा केली जाणार आहे. ही पशुगणना नोव्हेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत घेण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिल्या. पशुपालन ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून अर्थव्यवस्थेत याचे लक्षणीय योगदान आहे. 


शासनाला नियोजनासाठी पायाभूत सांख्यिकीची आवश्यकता असते. ही माहिती गणनेच्या स्वरूपात गोळा केली जाते. पशुधनाच्या निरंतर विकासासाठी योजना आखण्यासाठी पशुगणना महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असते. पशुपालन पूरक उत्पन्न निर्मिती बरोबरच दूध, अंडी व मांस ही पशुधन उत्पादने पोषक आहाराचा महत्त्वाचा स्रोत आहे. या पार्श्वभूमी ही पशुगणना लोकोपयोगी ठरणारी आहे. १९१९ पासून दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते. २०१९ मध्ये २०व्या पशुगणनेमध्ये प्रथमच प्रजाती ग्रामीण व नागरी क्षेत्रनिहाय पशुधनाची आकडेवारी गोळा करण्यात आली.


"अचूक पशुगणना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पशुसंवर्धन अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. ग्रामीण, शहरी भागासाठी प्रगणक व पर्यवेक्षक नेमण्यात आले. प्रगणकांद्वारे गोळा केलेली माहिती शासकीय योजनांसाठी खूपच उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे पशुपालकांनी आपल्याकडील माहिती प्रगणकांना द्यावी." 
- मंगेश काळे, उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन, चंद्रपूर


"जिल्ह्यात पशुगणना सुरु करण्यात आली. मोबाइल अॅपद्वारे ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या पशुगणनेतून जिल्ह्यातील किती पशुधन आहे, हे कळणार आहे. पाळीव पशूची गणना कशी करायची, पशू गणनेचा उद्देश आदी घटकांचे प्रगणकांना प्रशिक्षण देण्यात आले. पशुपालकांनी प्रशासनाला सहकार्य करावे." 
- डॉ. उमेश हिरुळकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि. प. चंद्रपूर


१६ प्रकारच्या प्राण्यांची जागेवर मोजणी 
कुटुंब घरगुती उद्योग व इतर संस्थांकडून पाळलेल्या गायवर्ग, म्हॅसवर्ग, मिथुन, याक, मेंढी, शेळी, डुक्कर, घोडा, शिंगरू, खेचर, गाढव, उंट, कुत्रा, ससा, हत्ती आणि कुक्कुट पक्षी जसे की कोंबडे- कोंबड्या, बदक, टर्की, इमू, क्चेल, गिनी, शहामृग तसेच इतर कुक्कुट पक्षी, अशा १६ प्रकारच्या प्राण्यांची जागेवर मोजणी करण्यात येणार आहे. तसेच भटकी कुत्री, गटक्या गाई व प्रथमच भटका पशुपालक समुदाय (पॅस्टोरल कम्युनिटी) यांचीदेखील माहिती गोळा करण्यात येणार आहे.

Web Title: Animal census started with the help of modern technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.