मूल पंचायत समितीतील पशुसंवर्धन विभाग लॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:30 AM2021-08-26T04:30:31+5:302021-08-26T04:30:31+5:30
राजू गेडाम मूल : शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारे पशुसंवर्धन विभाग कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे केवळ शोभेचा ठरत आहे. जनावरावर योग्य उपचार होण्यास ...
राजू गेडाम
मूल : शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारे पशुसंवर्धन विभाग कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे केवळ शोभेचा ठरत आहे. जनावरावर योग्य उपचार होण्यास अडचण निर्माण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. सव्वालाख लोकसंख्येच्या या मूल तालुक्यात पशु संवर्धन विभागाला अखेरची घरघर लागली असून नेहमी गजबजले असलेले पशुसंवर्धन कार्यालय सध्या ओस दिसत आहे. सध्या दोनच कर्मचारी असल्याने महत्त्वाचे काम आल्यास तेदेखील बाहेर जातात व या विभागाचे कार्यालय लॉक केले जाते.
पशुपालन व शेती व्यवसाय हा मूल तालुक्यातील शेतकरीवर्गाचा मुख्य व्यवसाय आहे. पशुधनाच्या व्यवसायापासून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविला जातो. पूर्वापार शेती व्यवसायाला आधुनिकतेची जोड मिळाल्याने नवनवीन यंत्रणा विकसित झाली. असे असले तरी पशुपालन हा शेतकऱ्यांचा व्यवसाय आजही कायम आहे. यासाठी शासन स्तरावर शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणून शेती व पशुपालन यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र एकिकडे पशुसंवर्धनाला प्रोत्साहन देण्याचे काम शासन करते तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त ठेवली जात असल्याने पशुसंवर्धनाला अखेरची घरघर लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मूल तालुक्यात असाच प्रकार दिसून येत आहे.
बॉक्स
चारपैकी एकच पद भरले
मूल येथील कार्यालयात पशुधन विकास अधिकाऱ्यांची चार पदे मंजूर असून यातील फक्त एकच पद भरलेले आहे. अनेक वर्षांपासून एकच पशुधन विकास अधिकारी प्रभार सांभाळत आहे. याही एकमेव असलेल्या अधिकाऱ्याची बदली झाली असून त्यांनाही बदलीच्या ठिकाणी जाण्याचे वेध लागल्याने ते फारसे कार्यालयात दिसत नाही. सहाय्यक पशुसंवर्धन विकास अधिकारी यांची चार पदे भरली असल्याने तालुक्यातील चिखली, चिमढा, नांदगाव व फिरते पथक हे आपली मदार सांभाळत असल्याने काहीसा भार कमी झाला असला तरी उपचारासाठी येणारी जनावरे बघता आणखी पदे भरण्याची गरज दिसते. पशुधन पर्यवेक्षक यांची चार पदे मंजूर असली तरी तीन जण कार्यरत आहेत. मात्र शिपाई पद रिक्त असल्याने त्यांचीही दमछाक होताना दिसत आहे.
बॉक्स
दरवाजावर चिठ्ठी
मूल येथील पशुसंवर्धन विभागाचे कार्यालय अनेकवेळा कुलूपबंद असते. त्यावेळी कार्यालयाच्या दरवाजाला मोबाइल नंबर लिहून असलेली चिठ्ठी चिपकविण्यात येते. त्यात महत्त्वाचे काम असल्यास वरील क्रमांकावर संपर्क करा, असे नमूद करण्यात येते. एक-दोन दिवसांआड असाच प्रकार होत असल्याचे दिसून येते.
कोट
पंचायत समितीतील पशुसंवर्धन विभागातील अनेक पदे रिक्त असल्याने सेवा देण्यास अडचण निर्माण होत आहे. येथे कार्यरत असलेले पशुधन विकास अधिकारी जांभुळे यांची बदली झाली आहे. जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय चंद्रपूर येथे महत्त्वाचे काम असल्यास जावे लागत असते. त्यामुळे कार्यालय बंद करून त्यावर संपर्क क्रमांकाची चिठ्ठी लावण्यात आली आहे.
-आर.जे.वेटे,पशुधन पर्यवेक्षक पंचायत समिती मूल.