प्राणी सेवाकेंद्र बंद पडणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 10:30 PM2018-09-18T22:30:59+5:302018-09-18T22:31:20+5:30
पिरली येथील 'पिपल्स फॉर अॅनिमल' संस्थेच्या प्राणी सुधार केंद्राला मिळणारी शासकीय मदत मागील पाच वर्षांपासून बंद करण्यात आली. त्यामुळे हे केंद्र आर्थिक संकटात सापडले आहे. केंद्रात सुमारे १०० जनावरे असून वैरणाचा खर्च कसा उभारावा, हा प्रश्न निर्माण झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
आयुधनिर्माणी (भद्रावती) : पिरली येथील 'पिपल्स फॉर अॅनिमल' संस्थेच्या प्राणी सुधार केंद्राला मिळणारी शासकीय मदत मागील पाच वर्षांपासून बंद करण्यात आली. त्यामुळे हे केंद्र आर्थिक संकटात सापडले आहे. केंद्रात सुमारे १०० जनावरे असून वैरणाचा खर्च कसा उभारावा, हा प्रश्न निर्माण झाला.
तत्कालीन केंद्रीय सामाजिक न्याय तथा पर्यावरणमंत्री मनेका गांधी यांच्या कल्पनेतून पिपल्स फॉर अॅनिमल संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेने देशभरात अनेक शाखा तयार केल्या आहेत. पिरली येथे डॉ. महावीर सोईतकर यांच्या अध्यक्षतेखाली हे केंद्र सुरू करण्यात आली. सचिवपदावर भद्रावती येथील डॉ. दिलीप धोंगडे काम पाहतात. या संस्थेला श्रीहरी धोंगडे यांनी जमीन दान दिली. त्या जागेवर प्राणीसेवा केंद्र सुरू करण्यात आले. प्रारंभी भारतीय जीव जंतू कल्याण बोर्डाकडून संस्थेला अल्पशी आर्थिक मदत मिळत होती. त्यावर केंद्राचा कारभार सुरू होता. मात्र २०१३ नंतर केंद्र सरकारची आर्थिक मदत बंद झाल्याने संस्थेचे कार्य अडचणीत आले. दरम्यान, केंद्र चालविण्यासाठी डॉ. सोईतकर यांनी पदरमोड करून दर महिन्याचा खर्च करीत होते. डॉ. धोंगडे यांनीही स्वत:ची मालमत्ता विकून केंद्राला हातभार लावणे सुरू ठेवले. पण केंद्रात १०० जनावरे व कर्मचाºयांचा खर्च सांभाळण्यासाठी ते आर्थिकदृष्ट्या हतबल झाले. कसायाकडून जप्त केलेली व अपघातातून वाचलेली अपंग जनावरे तथा गरीब शेतकºयांनी आणलेल्या शंभराहून अधिक जनावरांच्या रोजच्या वैरणाचा खर्च परवडत नाही. शासन एकीकडे गोपालनासाठी प्रोत्साहन देत असल्याची घोषणा करते तर दुसरीकडे अनुदान बंद करणे सुरू केले. त्यामुळे शहरातील गो-पालक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
लोकप्रतिनिधींची उदासिनता
केंद्र व राज्य शासनाने गोहत्या बंदी, गोपालन आदी विषयांवरून देशभरातील वातावरण ढवळून काढत आहेत. काही कट्टर धर्मवादी व्यक्ती अथवा संघटनांनी अस्मिताकेंद्री राजकारण करून वातावरण तापवत आहेत. पण गो-पालनासाठी प्रामाणिकपणे कार्य संस्थांना अनुदान देणे बंद केले. यावरून शेतकºयांमध्येही प्रचंड नाराजी आहे. लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविल्याने पिरली येथील केंद्र्र बंद पडण्याच्या मार्गावर आहे. समाजातील दानदात्यांनी केंद्राला मदतीचा हात पुढे केल्यास गो-पालनाचे कार्य अविरत सुरू राहू शकेल.