अंनिस करीत आहे दारूबंदी कार्यकर्त्यांचे ‘ब्रेन वॉश’
By admin | Published: June 10, 2016 01:07 AM2016-06-10T01:07:29+5:302016-06-10T01:07:29+5:30
दारूबंदीची मोहीम ज्यांच्या खांद्यावर आहे, अशांनाही अंधश्रद्धेने पछाडले असून अंनिस त्यांचे ‘ब्रेन वॉश’ करीत आहे.
नागभीड : दारूबंदीची मोहीम ज्यांच्या खांद्यावर आहे, अशांनाही अंधश्रद्धेने पछाडले असून अंनिस त्यांचे ‘ब्रेन वॉश’ करीत आहे. अशाच प्रकारचा एक कार्यक्रम गुरुवारी येथे पार पडला. जिल्हा पोलीस अधिक्षकांनीच हे कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिल्याचीही माहिती आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक वार्षिक तपासणीकरीता जिल्ह्यातील एका तालुक्यात गेले असता, त्यांनी पोलीस पाटलांशी दारूबंदीवर चर्चा केली. तेव्हा त्यांना अतिशय दाहक अनुभव आला. तेथील पोलीस पाटलाने सांगितले की, गावात एखाद्याची दारू पकडल्यानंतर आमच्या कुटुंबातील समस्य आजारी पडतात. दारू विकणारे जादूटोणा करतात. त्यामुळेच हे होते. पोलीस पाटलाने दिलेली ही माहिती ऐकून जिल्हा पोलीस अधिक्षकही अवाक् झाले आणि संपूर्ण जिल्ह्यात अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला.
दारूबंदी अभियानात पोलीस पाटील, पोलीस मित्र, दारूबंदी समितीचे पदाधिकारी, महात्मा गांधी तंटामुक्त समित्यांचे पदाधिकारी हे घटक अतिशय महत्त्वाचे घटक असून अंधश्रद्धेविषयी या सर्वांचे ‘ब्रेन वॉश’ व्हावे, यासाठी या सर्वांचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सहकार्याने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ही कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे.
नागभीड येथे गणेश मंगल कार्यालयात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विदर्भ संघटक हरिभाऊ पाथोडे, संजय घोनमोडे यांनी या कार्यशाळेत सहभागी झालेल्या पोलीस पाटील, पोलीस मित्र, दारूबंदी समितीचे पदाधिकारी, तंटामुक्त गाव समितीच्या पदाधिकाऱ्यांचे विविध दाखले देवून ‘ब्रेन वॉश’ केले. यावेळी नागभीडचे ठाणेदार बी.डी. मडावी, तळोधीचे ठाणेदार विवेक सोनवणे, स.पो.नि. एम.व्ही. ओगेवार उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)