वाघोबाच्या दर्शनाने अण्णांचा उडाला थरकाप
By admin | Published: December 30, 2014 11:31 PM2014-12-30T23:31:27+5:302014-12-30T23:31:27+5:30
दुपारची वेळ, सर्वत्र शांतता. शेतात शेतकरी व मजूर आपल्या कामात मग्न असताना अण्णा नामक व्यक्ती जंगलानजीक बंधाऱ्याजवळ नेहमीप्रमाणे गेला आणि बापरे..! वाघ दिसला! वाघ दिसताच,
वरोरा : दुपारची वेळ, सर्वत्र शांतता. शेतात शेतकरी व मजूर आपल्या कामात मग्न असताना अण्णा नामक व्यक्ती जंगलानजीक बंधाऱ्याजवळ नेहमीप्रमाणे गेला आणि बापरे..! वाघ दिसला! वाघ दिसताच, अण्णाने कसेबसे धोतर खोचूून गावाकडे धूम ठोकली. भीतीने गाळण उडालेले अण्णा तीन तास काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते.
वरोरा तालुक्यातील टेमुर्डा वनपरिमंडळ अंतर्गत येणाऱ्या बोरगाव (शि) येथील बहुतांश शेती जंगलालगत आहे. जंगलात बाबुंचे मोठे वन झाले असल्याने पूर्वी झुडपी जंगलासारखे दिसणारे जंगल आता घनदाट झाले आहे. २६ डिसेंबर रोजी बोरगाव (शि) येथील अण्णा खिरटकर (५०) हे शेतात काम करीत असताना, जंगला नजीकच्या सिंचन विभागाच्या बंधाऱ्याकडे दुपारी दोन वाजताच्या सुमारास गेले. तिथे थांबले असताना, मागे वळून बघितले तर काही अंतरावर पट्टेदार वाघ येताना दिसला. अण्णाला घामच फुटला. ते लगेच सिमेंंट बंधाऱ्यावर चढले आणि धोतर खोचून सरळ बोरगाव गावाकडे धुम ठोकली.
अण्णा पळत असल्याचे बघून शेतातील काम करणाऱ्या अनेकांनी अण्णाला आवाज दिला. मात्र, अण्णा थांबण्याच्या व बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. अण्णा धावत आहेत हे बघून शिवारातील मंडळीही त्यांच्यामागे धावायला लागली. मात्र, अण्णा थेट गावातच जावून थांबले. गावातील व्यक्तींनी त्यांना पळण्याचे कारण विचारले. परंतु, अण्णा नुसते बघत होते. त्यांचे शरीरही थरथरत होते. तीन तासानंतर अण्णा सावरले. कारण सांगितले, तेव्हा इतरांचीही बोलतीच बंद झाली. (तालुका प्रतिनिधी)