कर्जमाफीचे आकडे जाहीर करा

By admin | Published: June 28, 2017 12:48 AM2017-06-28T00:48:28+5:302017-06-28T00:48:28+5:30

मुख्यमंत्र्यांनी ३४ हजार कोटी रुपयांचे शेतकऱ्यांचे कर्जमाफ केल्याचा गाजावाजा करतानाच याचा थेट फायदा ४० लाख शेतकऱ्यांना होणार असल्याचे सांगितले.

Announce debt relief figures | कर्जमाफीचे आकडे जाहीर करा

कर्जमाफीचे आकडे जाहीर करा

Next

विजय वडेट्टीवार : कर्जमाफीच्या नावावर शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मुख्यमंत्र्यांनी ३४ हजार कोटी रुपयांचे शेतकऱ्यांचे कर्जमाफ केल्याचा गाजावाजा करतानाच याचा थेट फायदा ४० लाख शेतकऱ्यांना होणार असल्याचे सांगितले. हा आकडा आला कोठून, असा थेट सवाल करीत ही आकडेवारी राज्य शासनाने जिल्हानिहाय जाहिर केल्यास शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक झाल्याचे निष्पन्न होईल, असा आरोप आ. विजय वडेट्टीवार यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.
ज्यांच्याकडे ३० जून २०१६ पूर्वीचे कर्ज थकित होते. असेच शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहे. ३० जून २०१७ पर्यंत ५० ते ६० टक्केपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केलेली आहे. येथेच शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने फसवणूक झालेली आहे. ३० जून २०१७ पर्यंत थकित असलेल्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिली असती तर सर्वच शेतकऱ्यांचा याचा फायदा झाला असता याकडेही आ. वडेट्टीवार यांनी लक्ष वेधले.
६० टक्के शेतकऱ्यांनी जुने कर्ज फेडून नवीन कर्ज घेतले आहे. कर्जमाफीतून शासनाने बाजार समितीतील संचालक, पं.स. सदस्य, १५ हजार पेन्शन घेणारे, तसेच ४ लाख उत्पन्न घेतात, आयकर भरणारे, अशा शेतकऱ्यांना वगळले आहे. शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचे आई-वडिल असतील त्यांचाच यात समावेश केलेला आहे. ज्यांनी कर्जाची परतफेड केली त्यांना जास्तीत जास्त २५ हजार रुपयांचाच फायदा होणार आहे. दीड लाख रुपयांचे कर्जमाफ म्हणजेही शुद्ध फसवणूक आहे. ज्या शेतकऱ्याकडे तीन लाख रुपये कर्ज आहे. त्यांना ही माफी घ्यावयासाठी आधी उर्वरित दीड लाख रुपये जमा करायचे आहे. त्यानंतर ही कर्जमाफी मिळणार आहे. शेतकऱ्यांकडे दीड लाख असते तर त्यांनी ते पहिलेच भरले असते. दीड लाखांची कर्जमाफीही पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने दिली जाणार आहे, मग ही कर्जमाफी ऐतिहासिक कशी, असा सवालही उपस्थित केला.
केवळ ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करुन उर्वरित ५० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा का करणार नाही, याकडे लक्ष वेधून आ. वडेट्टीवार म्हणाले, एकूणच कर्जमाफीचा आढावा घेतला तर ही कर्जमाफी आठ ते १० कोटींच्या वर जात नाही. २०१६ ची अट घातल्याने कर्जवाटपात राज्यात पहिल्या क्रमांकावर असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ११७६ कोटींपैकी केवळ ४१६ कोटी, चवथ्या क्रमांकाचे कर्ज वाटप करणाऱ्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ७४४ कोटींपैकी ३२४ कोटींची कर्जमाफी शेतकऱ्यांना देता येणार आहे. राष्ट्रीयकृत बँकांचा वाटा केवळ २२ टक्के आहे. त्यांची वसुली मात्र ८० टक्केवर आहे. ही कर्जमाफी हास्यास्पद असल्याचा आरोपही त्यांनी केला.
शासनाची ही कर्जमाफी फसवी नसेल, तर कर्जमाफीचे आकडे जिल्हानिहाय जाहीर करावे. कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना फायदा होणार. ३० जून २०१७ पर्यंतची सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणीही यावेळी आ. वडेट्टीवार यांनी केली. या कर्जमाफीच्या विरोधात शेतकऱ्यांची सुकाणू समिती ९ जुलैपासून रस्त्यावर उतरणार आहे. काँग्रेसचा पूर्ण पाठींबा असणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रदेश काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महेश मेंढे, दिनेश चोखारे,घनश्याम मुलचंदानी, शिवा राव व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Announce debt relief figures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.