‘त्या’ ५३ गावांत दुष्काळ घोषित करा
By admin | Published: December 29, 2014 11:40 PM2014-12-29T23:40:20+5:302014-12-29T23:40:20+5:30
खरीप हंगाम २०१४ मध्ये राजुरा तालुक्यातील १११ गावांपैकी फक्त ५८ गावातील पीक परिस्थिती पाहून संबंधित अधिकाऱ्यांनी ५० पैसे पेक्षा कमी आणेवारी दाखवून ही गावे दुष्काळग्रस्त म्हणून
शेतकऱ्यांची मागणी : आंदोलनाचा इशारा
राजुरा : खरीप हंगाम २०१४ मध्ये राजुरा तालुक्यातील १११ गावांपैकी फक्त ५८ गावातील पीक परिस्थिती पाहून संबंधित अधिकाऱ्यांनी ५० पैसे पेक्षा कमी आणेवारी दाखवून ही गावे दुष्काळग्रस्त म्हणून समाविष्ट करण्यात आली. उर्वरित गावांत संबंधित अधिकाऱ्यांनी पीक परिस्थिती बघितली नाही. याचा फटका ५३ गावातील शेतकऱ्यांना बसणार आहे.
या गावातील शेतकरी २५ ते ३० वर्षांपासून कापूस, सोयाबीन पीक घेत आहेत. सातबारामध्ये सुद्धा कापूस सोयाबीन, धान, तूर पिकाची नोंद आहे. मात्र, गावनिहाय सर्व्हे करण्याची तसदी अधिकाऱ्यांनी न घेतल्याने ५३ गावे पैसेवारीपासून वंचित राहिले. आणेवारी प्रत्येक गावात गाव तलाठी, कृषी सहायक, पोलीस पाटील, सरपंच व गावकरी समक्ष प्लॉट टाकून पिकाची पाहणी करून आणेवारी काढली जाते, पण तसे न करता अधिकाऱ्यांनी गावात न जाता प्रत्यक्ष कार्यालयात बसून जुन्या पद्धतीने आणेवारी काढली. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाकडून मिळणाऱ्या मदतीपासून या गावातील शेतकऱ्यांना वंचित राहावे लागणार आहे.
कर्ज घेऊन मेहनतीने तालुक्यातील शेतकऱ्यांनी दुबारा-तिबारा पेरणी करून पिके वाढविली. परंतु, शेवटच्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे सोयाबीन प्रती बॅग ३० किलो मागे फक्त १०० किलोची उतारी मिळाली. तर बाजारभाव केवळ २५०० रुपये मिळाला. प्रति एकर खर्च आठ हजार रुपये आले. कपाशीचे पीक पाहून दिलासा मिळाला. परंतु पावसाने दांडी मारल्याने कपाशीची वाढ खुंटली. यातच लाल्या रोगाचा प्रार्दुभाव वाढल्याने प्रति एकर दोन ते तीन क्विंटल उत्पन्न झाले. कापसाची पडत्या भावाने विक्री होत आहे.
पावसाच्या लहरीपणामुळे धान पीक करपले. अशात ज्या ठिकाणी ५० पैसे पेक्षा कमी आणेवारी आहे, ते क्षेत्र बाधीत करण्यात यावे, अशी विनंती शेतकऱ्यांनी केली होती. केंद्राने हे मान्य केल्यामुळे केंद्राकडून मदत मिळाल्यानंतर पंचनामे न करता मदत दिल्या जाईल, असे राज्य सरकारचे म्हणने आहे. मात्र, ५३ गावे पुर्वीच्या आणेवारीमुळे मदतीपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे गावनिहाय प्रत्यक्ष पीक परिस्थिती पाहून, पैसेवारी ५० पैसे पेक्षा कमी आणेवारी दाखवून उर्वरीत ५३ गावे दुष्काळ घोषीत करावे, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)