चंद्रपूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा
By admin | Published: October 26, 2015 01:14 AM2015-10-26T01:14:02+5:302015-10-26T01:14:02+5:30
राज्यातील सन २०१५-१६ च्या खरीप हंगामातील पिकांची हंगामी पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आलेल्या १४,७०८ गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती ...
मुख्यमंत्र्यांना पत्र : वडेट्टीवार यांची मागणी
चंद्रपूर: राज्यातील सन २०१५-१६ च्या खरीप हंगामातील पिकांची हंगामी पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आलेल्या १४,७०८ गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती राज्य शासनाने २० आॅक्टोबर रोजी जाहीर केली. त्याप्रमाणे अध्यादेश काढलेला आहे. त्यात चंद्रपूर जिल्ह्याला पूर्णत: वगळलेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती असून शेतकऱ्यांनी दुबार, तिबार पेरणी करुनसुद्धा पाण्याअभावी धान, सोयाबिन, कापूस यासारखे पीक उद्ध्वस्त झाले आहे. शेतामध्ये जे काही पीक उभे आहेत, त्यामधून ५० टक्क्यापेक्षाही कमी उत्पादन होणार असल्याने आर्थिक परिस्थिती अभावी शेतकरी हवालदिल होणार आहे. केंद्र आणि राज्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील दोन मंत्री असताना सुद्धाराज्य शासनाने दुष्काळसदृश परिस्थितीमधून चंद्रपूर जिल्ह्याला वगळलेले असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम केले आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करुन सरसकट प्रती हेक्टर २० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी अन्यथा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढून आंदोलन केले जाईल, असा इशारा काँग्रेस पक्षाचे उपगट नेता तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे.
सुरुवातीला चांगल्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची सुरुवात केली. परंतु नंतर वेळोवेळी कधी जास्त तर कधी कमी प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार आणि तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतर पावसाने दगा दिल्यामुळे हजारो हेक्टर शेतातील पिके उद्धवस्त झालीत तर काही पिके शेतामध्ये उभे असून त्या पिकांची वाढसुद्धा बरोबर झालेली नाही.
पिकांची परिस्थितीसुद्धा पोटरी, फुलोरा व लोबी अवस्थेत असून सदर पिकावर तुडतुडे, खोडकिडा, कडाकरपा, पाने गुंडाळणारी अळी व लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे धान, सोयाबिन, कापूस पिकांचे उत्पादन ५० टक्क्याच्यावर होणार किंवा नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. (प्रतिनिधी)