गोंडवानाला आदिवासी विद्यापीठ घोषित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 01:08 AM2019-06-12T01:08:22+5:302019-06-12T01:08:59+5:30
राज्यात आदिवासी समाज मोठ्या संख्येने असताना या राज्यात आदिवासी विद्यापीठ नाही. त्यामुळे आदिवासी समाजाचा शैक्षणिक विकास पाहिजे त्या प्रमाणात झाला नाही. इतर राज्यांमध्ये आदिवासी विद्यापीठ असल्यामुळे तेथील आदिवासी समाजाचा शैक्षणिक विकास झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्यात आदिवासी समाज मोठ्या संख्येने असताना या राज्यात आदिवासी विद्यापीठ नाही. त्यामुळे आदिवासी समाजाचा शैक्षणिक विकास पाहिजे त्या प्रमाणात झाला नाही. इतर राज्यांमध्ये आदिवासी विद्यापीठ असल्यामुळे तेथील आदिवासी समाजाचा शैक्षणिक विकास झाला आहे. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठाला आदिवासी विद्यापीठ घोषित करावे व चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळा बंद करून या विद्यापीठात समाविष्ठ करण्याची मागणी महाराष्ट्र तेली समाज आरक्षण संघर्ष समितीचे संयोजक योगेश समरित यांनी केली आहे.
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी समाज मोठ्या संख्येने आहे. या समाजाचा शैक्षणिक दृष्टिकोन बघता आदिवासी विद्यापीठ निर्माण केल्यास भविष्यात त्याचे चांगले परिणाम दिसून येतील.
नुकताच दहावी व बारावीचा निकाल लागला आहे. यामध्ये दोन्ही जिल्ह्यातील आश्रमशाळांचा निकाल कमी लागला आहे. आदिवासी मुलामुलींसाठी मॉडेल इंग्लीश कॉन्व्हेंटची स्थापना या विद्यापीठांतर्गत करण्यात यावी, तरच या समाजाचा शैक्षणिक विकास होऊ शकेल, असेही या निवेदनात समरित यांनी म्हटले आहे. इतर राज्यांमध्ये आदिवासी विद्यापीठांची स्थापना झाली असून, व्यवस्थित कार्यरत आहे. तेथील विद्यापीठांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही आदिवासी विद्यापीठ स्थापन झाल्यास या समाजाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी निवेदनाद्वारे केली व्यक्त केली आहे.