निनावी तक्रार अर्ज होणार आता बेदखल
By Admin | Published: October 26, 2015 01:12 AM2015-10-26T01:12:10+5:302015-10-26T01:12:10+5:30
वैयक्तीक आकसापोटी किंवा दबावाच्या भीतीने प्रशासकीय कार्यालयाकडे दाखल होणाऱ्या निनावी व खोट्या सहीने केलेल्या तक्रारीची आता दखल घेतली जाणार नाही.
राजकुमार चुनारकर खडसंगी
वैयक्तीक आकसापोटी किंवा दबावाच्या भीतीने प्रशासकीय कार्यालयाकडे दाखल होणाऱ्या निनावी व खोट्या सहीने केलेल्या तक्रारीची आता दखल घेतली जाणार नाही. याबाबत अप्पर मुख्य सचिव डॉ.पी.एस. मीना यांनी निनावी व खोट्या तक्रारींची दखल घेवू नये, असा आदेश मंत्रालयासह राज्यातील सर्व प्रशासकीय कार्यालयांसाठी जारी केला आहे. या आदेशामुळे खोट्या तक्रारी करणाऱ्यांवर आळा बसून त्यांच्या दुकानदाऱ्या बंद होणार आहे.
प्रशासकीय कार्यालयामध्ये महसुल, पोलीस विभाग तथा इतरही विभागाकडे निनावी तक्रारी दाखल होत असतात. आज अखेर अशा तक्रारींची तात्काळ दखल घेऊन चौकशी केली जात असे. परंतु, बहुतांश तक्रार अर्ज हे प्रतिस्पर्धी व्यक्तीला बदनाम करण्यासाठी कार्यालयाकडे पाठविले जात असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले.
त्यामुळे केंद्र सरकारच्या १८ आॅक्टोबर २०१३ च्या शासन नियमानुसार अप्पर मुख्य सचिव डॉ. मीना यांनी तक्रारदाराचे नाव व पत्ता नोंद केलेला नाही, अशा निनावी तक्रारीमध्ये कोणत्याही स्वरूपाची माहिती अंर्तभुत असली तरी त्यावर कार्यवाही करण्यात येवू नये. ती तक्रार फक्त दप्तरी नोंद करावी, असा आदेश काढला आहे.
या आदेशाप्रमाणे सर्वच शासकीय कार्यालयातून कार्यवाही करण्यात येणार आहे.
या नव्या आदेशामुळे निनावी खोट्या व हेतू पुरस्कर तक्रारी करुन वचपा काढण्याच्या अनेकांच्या मनसुब्यावर पाणी फेरण्यात आले आहे.
तसेच खोट्या तक्रारी करून काही प्रमाणात ‘लक्ष्मी दर्शन’ करण्याच्याही प्रकारावर या आदेशामुळे लगाम लागणार असल्याचे शासकीय वर्तुळातून बोलल्या जात आहे.
आरोपात तथ्य असल्यास दखल
ज्या तक्रारीमध्ये पडताळणी करता येऊ शकते, असे आरोप केलेले आहेत, अशा तक्रारी संबंधात प्रशासकीय किंवा मंत्रालयाने त्याची दखल घ्यावी. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मान्यतेने ती तक्रार मुळ तक्रारदाराकडे पाठवून ती त्याने स्वत: केली आहे काय, याबाबत खात्री करून घेण्यात यावी. त्याच्याकडून पंधरा दिवसात प्रतिसाद मिळाला तर स्मरणपत्र पाठविण्यात यावे. त्यानंतरही माहिती प्राप्त न झाल्यास ती तक्रार खोट्या नावाची असल्याची नोंद करून दप्तरी दाखल करण्यात यावी. तसेच आपण स्वत: तक्रार केल्याचे मान्य केल्यास त्यावर कार्यवाही करताना तक्रार अर्जातील नाव, पत्ता गोपनीय ठेवून त्याची छायांकीत प्रत काढून ती चौकशीसाठी संबंधित यंत्रणाकडे द्यावी व अर्जाप्रमाणे कार्यवाही करावी असे या आदेशात म्हटले आहे.
ब्लॅकमेलिंगवर बसणार आळा
निनावी खोट्या तक्रारी करायच्या व नंतर वरिष्ठाकडून दबाव आणण्याच्या प्रकारात अलीकडे चांगलीच वाढ झाल्याचे काही प्रकरणावरुन निदर्शनात आले. ज्याच्या संबंधात तक्रार आहे, त्याच्याकडून काही मिळाले तर तक्रार परत घ्यायची, असे प्रकार हल्ली वाढले होते. मात्र या आदेशामुळे अशा महाभागावर आळा बसण्यास मदत होणार आहे.