जादुटोणाविरोधी कायद्यामुळे नरबळीला आळा बसेल
By admin | Published: November 26, 2014 11:04 PM2014-11-26T23:04:40+5:302014-11-26T23:04:40+5:30
जादुटोणाविरोधी कायदा हा खऱ्या अर्थाने क्रांतिकारी कायदा आहे. याची प्रभावीरित्या अंमलबजावणी झाल्यास नरबळीसाररख्या अमानुष प्रकारांना आळा बसेल, असे मत कार्यक्रम अंमलबजावणी,
चंद्रपूर : जादुटोणाविरोधी कायदा हा खऱ्या अर्थाने क्रांतिकारी कायदा आहे. याची प्रभावीरित्या अंमलबजावणी झाल्यास नरबळीसाररख्या अमानुष प्रकारांना आळा बसेल, असे मत कार्यक्रम अंमलबजावणी, प्रसार आणि प्रचार समितीचे सहअध्यक्ष तथा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी केले.
सामाजिक न्याय व विशेष सहायक विभाग समाजकल्याण आयुक्तालय पुणे यांच्या वतीने सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण चंद्रपूर यांच्याद्वारा स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयाच्या पटांगणात आयोजित व्याख्यानाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून समाजकल्याण विभाग नागपूरचे प्रादेशिक उपायुक्त आर.डी. आत्राम, पीआयएमसी सदस्य सुरेश झुरमुरे, अभाअंनिसचे महाराष्ट्र राज्य संंघटक दिलीप सोळंके, जिल्हाध्यक्ष अॅड. गोविंद भेंडारकर, जिल्हा परषिदेचे समाजकल्याण अधिकारी विजय वाकूलकर यांची उपस्थिती होती.
प्रा. श्याम मानव म्हणाले, या जगात कोणीही चमत्कार करु शकत नाही. चमत्काराचे समर्थन करणारे आणि विश्वास ठेवणारे बाबांच्या बुवाबाजीला बळी पडतात. या जगात जादुटोणा, मंत्रतंत्रांचे अस्तित्व नसतानाही जादुटोणाच्या संशयापोटी अनेक घटना घडत आहेत. त्याआधी जादुटोणाविरोधी कायद्याचा प्रचार आणि प्रसार करणे काळाची गरज असून सर्व सुज्ञ जनतेने या क्रांतिकारी कायद्याचे वाहक बनावे, असे आवाहन याप्रसंगी प्रा. मानव यांनी केले. सदर कार्यक्रमात तथाकथीत बुवा-बाबांचे चमत्कार करुन दाखवून त्यामागील वैज्ञानिक कारणेही सांगण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले की, अंधश्रद्धेचे निर्मूलन होणे आणि समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजणे गरजेचे आहे. या कायद्याचा प्रचार व प्रसार होणे आवश्यक आहे. प्रादेशिक उपायुक्त, आर.डी. आत्राम यांनीही कायद्याचा प्रचार-प्रसाराच्या कार्यक्रमांना लाभत असलेल्या जनतेच्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. प्रास्ताविक दिलीप सोळंके , संचालन हरिभाऊ पाथोडे यांनी तर आभार सहायक आयुक्त प्रसाद कुळकर्णी यांनी केले. कार्यक्रमासाठी अनिल दहागावकर, गजानन मरस्कोले, धनंजय तावाडे, अभय गौर, सुलेमान बेग आदी उपस्थित होत. (नगर प्रतिनिधी)