एपीएल शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याच्या लाभ मिळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:28 AM2021-05-09T04:28:24+5:302021-05-09T04:28:24+5:30
घुग्घुस : मागील वर्षी लाॅकडाऊनमध्ये राज्य व केंद्र शासनाने शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य पुरवठा केला व परत या महिन्यापासून दोन ...
घुग्घुस : मागील वर्षी लाॅकडाऊनमध्ये राज्य व केंद्र शासनाने शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य पुरवठा केला व परत या महिन्यापासून दोन महिने मोफत धान्य पुरवठा करीत आहे. मात्र, या योजनेच्या लाभापासून एपीएल शिधापत्रिकाधारकांना वंचित केले आहे. त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी राज्य व केंद्र शासनाकडे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रवादी मागासवर्गीय तालुका सेलचे तालुका अध्यक्ष सत्यनारायण डकरे यांनी केली आहे.
मागील वर्षांपासून एपीएल शिधापत्रिकाधारकांना सरकारी स्वस्त धान्य दुकानातून कोणत्याही प्रकारचे पैसे देऊन किंवा शासनाकडून मोफत धान्य मिळत नाही, तर काही लोकांनी वेळोवेळी शिधापत्रिका बदलून किंवा दुसऱ्या योजनेतून लाभ मिळणाऱ्या योजनेत समाविष्ट करण्यासाठी केविलवाणा प्रयत्न केला असला असले तरी ते होत नाही. त्यामुळे हजारो लोक सरकारी स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या लाभापासून वंचित आहेत. मागील वर्षी पहिली व सध्या सुरू असलेल्या कोविडच्या लाटेमुळे हातावर पोट असलेल्या लोकांचे, छोटेमोठे व्यवसाय करून पोट भरणाऱ्या लोकांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. अशातच एपीएलची शिधापत्रिका असली तरी कोणत्याही प्रकारचा लाभ या वर्गातील शिधापत्रिकाधारकांना मिळत नाही. त्यांना शासनाच्या स्वस्त धान्याचा लाभ मिळावा, त्याचबरोबर शासनाकडून तेल, डाळ, साखरेचा पुरवठा करावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे.