लसीकरण करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:21 AM2021-06-05T04:21:57+5:302021-06-05T04:21:57+5:30

चंद्रपूर : कोरोना लसीकरणाबाबत अनेक गैरसमज पसरले आहेत. परिणामी, अनेकजण लसीकरण करण्यास धजावत नाहीत. मात्र, यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता ...

Appeal to be vaccinated | लसीकरण करण्याचे आवाहन

लसीकरण करण्याचे आवाहन

Next

चंद्रपूर : कोरोना लसीकरणाबाबत अनेक गैरसमज पसरले आहेत. परिणामी, अनेकजण लसीकरण करण्यास धजावत नाहीत. मात्र, यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. लसीकरण हे पूर्णत: सुरक्षित असून कोणताही धोका नसल्याने लसीकरण करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून होत आहे.

ताडपत्री घेण्यासाठी नागरिकांची धावाधाव

चंद्रपूर : पावसाळा अगदी काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे ग्रामीण नागरिक घरांच्या डागडुजीच्या कामाला लागले आहेत. परंतु, दुकाने बंद असल्याने मोठी अडचण जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात नागरिकांना मोठी धावाधाव करावी लागत आहे.

खासगी शिकवणी क्लासचे नुकसान

चंद्रपूर : लॉकडाऊननंतर सर्वच बंद झाल्याने खासगी शिवकणी क्लासवरही निर्बंध आले. परिणामी, शिकवणी वर्ग संचालकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना शिकवणीपासून मुकावे लागत आहे. त्यामुळे नियमांचे पालन करून शिकवणी वर्गाला परवानगी द्यावी, अशी मागणी खासगी शिकवणी क्लासच्या संचालकांनी केली आहे.

पोलिसांसाठी

रस्त्यावर मंडप

चंद्रपूर : नागरिकांना घराबाहेर निघण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. असे असतानाही अनेकजण घराबाहेर पडत आहे. त्यामुळे या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी शहरात विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता पोलिसांना थांबण्यासाठी विविध ठिकाणी मंडप टाकण्यात आले आहेत.

नातेवाइकांच्या भेटीगाठीस उत्सुकता

चंद्रपूर : ग्रामीण भागात उन्हाळा आला की, लग्नसराईचा हंगाम सुरू होतो. त्या काळात शेतकरी, शेतमजूर शेतीचे कामे आटोपून लग्नसमारंभ कार्यक्रम करतात. परिणामी, या काळात कोरोनामुळे संचारबंदी लागू झाली. कोरोनाच्या संचारबंदीमुळे अनेक कुटुंबीयांनी जुळलेले व नियोजित लग्नसमारंभ पुढे ढकलले. कोरोनाच्या संचारबंदीमुळे सर्व सार्वजनिक कार्यक्रमसुद्धा रद्द झाल्याने नातेवाइकांच्या भेटीगाठी बंद झाल्याने नागरिक भेटीगाठीस उत्सुक झाले आहेत.

मोकाट प्राण्यांची उपासमारी

चंद्रपूर : लॉकडाऊन असल्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठ बंद आहे. परिणामी, मोकाट प्राण्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक स्वयंसेवी संस्था त्यांना खाऊ घालत आहेत. बिस्कीट देत आहेत. मात्र, शहरातील अनेक भागांत जनावरे अन्नाची शोधाशोध करीत फिरत असताना दिसून येत आहे.

एटीएममध्ये रक्कम नसल्याने आर्थिक कोंडी

चंद्रपूर : शहरातील बऱ्याच बँकांचे एटीएम बंद असल्याने नागरिकांची आर्थिक कोंडी होत आहे. कोरोनामुळे बँकेतील व्यवहारावर निर्बंध आले आहेत. विशिष्ट वेळेतच व्यवहार सुरू आहेत. नागरिकांना आर्थिक गरजा भागविण्यासाठी पैशाची गरज आहे. परंतु, राष्ट्रीयीकृत बँकांच्या एटीएममध्ये पैसे नाहीत. त्यामुळे बँक प्रशासनाने एटीएममध्ये पैशाची व्यवस्था करण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.

सुबाभूळ लागवडीसाठी अनुदान द्या

चंद्रपूर : सुबाभूळ लागवडीकरिता शेतकऱ्यांना कृषी व वनविभागाने अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. यातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ होतो. त्यामुळे स्थानिक स्तरावरून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन अनुदान द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

राज्यातील वाजंत्रीना आर्थिक मदत करा

चंद्रपूर : वाजंत्री व बँड वाजविणाऱ्या लोकांचा व्यवसाय लॉकडाऊनमुळे ठप्प झाला आहे. या व्यवसायावर जगणाऱ्या मादगी, मातंग, तसेच अन्य जातीची आर्थिक स्थिती हलाखीची झाली आहे. त्यामुळे राज्यभरातील वाजंत्रींना राज्य शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात लग्न व अन्य समारंभात त्यांना काम मिळत असते. मात्र, मागील वर्षीपासून कोरोनाने आर्थिक संकट निर्माण झाले आहे.

‘त्या’ डबक्याने आरोग्य धोक्यात

चंद्रपूर : शहरातील सिस्टर कॉलनी परिसरातील शिलवंत बुद्धविहार परिसरात पाण्याचे डबके तयार झाले आहे. त्यामुळे या परिसरात डासांची उत्पत्ती होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. याबाबत अनेकदा मनपाला निवेदन देण्यात आले. मात्र, याकडे दुर्लक्ष होत आहे.

शहरातील मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली

चंद्रपूर : कोरोना संचारबंदीच्या कालावधीत तब्बल दीड महिन्यानंतर चंद्रपूर शहरातील सर्व दुकाने खोलण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, चंद्रपुरात दुसरा रुग्ण आढळताच केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश दिले. मात्र, तरीसुद्धा शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसून येत आहे. चौकाचौकांत तैनात असणारा पोलिसांची चमूही दिसेनाशा झाला आहे. त्यामुळे मुक्तसंचार सुरू आहे.

स्वच्छता कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची मागणी

चंद्रपूर : जिल्ह्यातील सर्वच नगर परिषदांनी पावसाळ्यापूर्वीच्या कामाला सुरुवात केली आहे. कोरोनाची दहशत असतानाही कर्मचारी प्राणाची बाजी लावत नाल्यांची स्वच्छता करीत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना विशेष बोनस देण्याची मागणी करण्यात आली आहे.

रेशन दुकानदारांची दमछाक वाढली

चंद्रपूर : राज्य शासनाने केशरी, अंत्योदय, तसेच प्राधान्य कुटुंबांना रेशन देणे सुरू केल्याने सध्या ग्रामीण, तसेच शहरी भागातील रेशन दुकानांमध्ये गर्दी वाढली आहे. नागरिक पहाटेपासून दुकानांसमोर सोशल डिस्टन्स ठेवून रांगा लावत आहे. यामध्ये मात्र रेशन दुकानदारांची दमछाक होत आहे.

गोल बाजारात

वाहनांची गर्दी

चंद्रपूर : कोरोनामुळे संचारबंदी लागू करण्यात आली असून प्रशासनाने काही नियम, तसेच अटींवर बाजारपेठ सुरू केली आहे. मात्र, काही व्यापारी, ग्राहक मनमर्जीने वाट्टेल तिथे आपली वाहने पार्क करीत आहेत. त्यामुळे येथील गोल बाजार परिसरात वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे.

गावातील भाजीपाला

थेट ग्राहकांपर्यंत

चंद्रपूर : कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. परिणामी, ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या शेतातील भाजीपाला बाजारात न नेता थेट ग्राहकांच्या दारात घेऊन जात आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा होत असून ग्राहकांनाही ताजा भाजीपाला मिळत आहे.

मूल रोड परिसरात पहाटे गर्दी

चंद्रपूर : लॉकडाऊनमुळे संचारबंदी आहे. त्यामुळे सायंकाळी ७ ते रात्री ७ वाजेपर्यंत नागरिकांना बाहेर निघण्यावर बंदी आहे. असे असले तरी बंगाली कॅम्प परिसरातून मोठ्या प्रमाणात नागरिक मार्निंग वॉकसाठी घराबाहेर पडत आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

जि. प. ने बियाणे

स्वस्त दरात पुरवावे

चंद्रपूर : कोरोनामुळे झालेले नुकसान बघता शेतकऱ्यांना पेरणीसाठी बी-बियाणे स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे, यावर्षी काही शेतकऱ्यांनी अद्यापही आपल्याकडील धान्य विक्री केले नसल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

हरभरा उत्पादकांना

बोनस द्यावा

चंद्रपूर : कोरोनामुळे हरभऱ्याची सरकारी खरेदी सुरू झाली नाही. यावर्षी हरभऱ्याला शासनाने ४ हजार ८७५ रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला. मात्र, अत्यल्प दराने व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीची पावती बघून जेवढा शेतमाल असेल तेवढीच रक्कम राज्य शासनाने बोनस म्हणून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे.

ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील काही गावांमध्ये पाण्याची टंचाई भासत आहे. जिवती पहाडावरील गावांमध्ये तीव्रता अधिक आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच उपाययोजना करून या गावांना पाणी पुरवठ्यासंदर्भात उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आहे.

किराना दुकानात सोशल डिस्टन्सचा फज्जा

चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स ठेवणे गरजेचे आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना केल्या जात आहे. असे असतानाही दुकानांमध्ये सोशल डिस्टन्स न पाळता जीवनावश्यक साहित्याची खरेदी केली जात आहे.

Web Title: Appeal to be vaccinated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.