शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन
By admin | Published: June 7, 2017 12:51 AM2017-06-07T00:51:18+5:302017-06-07T00:51:18+5:30
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती करावी, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित स्वामीनाथन कमिशनच्या शिफारशीप्रमाणे हमीभाव द्यावा,...
किसान क्रांती मोर्चा समन्वय समिती : संपाला संघटनांचा पाठिंबा
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती करावी, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित स्वामीनाथन कमिशनच्या शिफारशीप्रमाणे हमीभाव द्यावा, आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी किसान क्रांती मोर्चा समन्वय समितीतर्फे तहसीलदरांमार्फंत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी येथील सर्व शेतकरी किसान क्रांती मोर्चाच्या नेतृत्वात संपावर जाण्याची घोषणा करुन संपूर्ण महाराष्ट्रात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या संपाला ब्रह्मपुरी तालुक्यातील विविध पक्षाचा व संघटनेचा पाठींबा असल्याचे घोषित करण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या विविध मागण्याच्या पूर्ततेसाठी संप पुकारण्यात आला आहे. त्या संपाचे लोन ब्रह्मपुरीमध्येही उमटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी या प्रमुख मागणीसह आदी मागण्याच्या पूर्ततेसाठी सोमवारला तहसीलदारांंना निवेदन देण्यात आले.
या शिष्टमंडळात विनोद झोडगे, नामदेव नखाते, प्रा. अमृत नखाते, अतुल राऊत, जगदिश पिलारे, अॅड. गोविंद भेंडारकर, महेश पिलारे, राऊत, प्रकाश चौधी उपस्थित होते.
या आहेत मागण्या
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती करावी, धानाला प्रती क्विटल तीन हजार रूपये हमीभाव देण्यात यावे, विकासाच्या कोणत्याही प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या पिकावू जमिनीवर अतिक्रमण करू नये, वयाच्या ६० वर्षानंतर शेतकरी, शेतमजूर, कारागीर व असंघटीत कामगारांना दरमहा १० हजार रूपये पेन्शनचा कायदा लागू करावा, रेशन व्यवस्था मजबूत करून अन्नसुरक्षतेची हमी देण्यात यावी, आदिवासी गैर आदिवासी शेतकऱ्यांसाठी २००६ सालच्या जंगल जमिनीबाबतच्या कायद्याची अंमलबजावणी करून जमिनीचे पट्टे देण्यात यावे, जमीन, पाणी, अवजारे, खत, औषधे यावरील सबसीडी पूर्वरत करावी, वीज दरवाढ ताबडतोब थांबवून शेतकऱ्यांचे वीजबील माफ करावे, शेतमजूर व असंघटित कामगारांना प्रति दिन ३५० रू. किमान वेतन द्यावा असा कायदा करावा या मागण्याचा समावेश आहे.