राजुरा शहरातील गुंडगिरीला आवर घाला
By admin | Published: July 12, 2015 01:20 AM2015-07-12T01:20:53+5:302015-07-12T01:20:53+5:30
राजुरा शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले असून त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
बी.यू.बोर्डेवार ल्ल राजुरा
राजुरा शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले असून त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. राजुरा पोलिसांचा गुंडावरील धाक संपुष्टात आला की काय, अशी शंका निर्माण होण्याईतकी परिस्थिती बिघडली आहे. भारतीय जनता पक्षाचे राजुरा शहर अध्यक्ष तथा पत्रकार बादल बेले यांच्यावर हल्ला केला जातो. कर्नल चौकातून रामनगर कॉलनीपर्यंत त्यांना बेदम मारहाण करीत नेले जाते, एखाद्या सिनेमात शोभावी अशी ही थरारक घटना परवा राजुरा शहरातील नागरिकांनी पाहिली. याला गुंडाराज म्हणावे नाही तर काय? राजुरा शहरातील वातावरण दूषित होत चालल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे. हे गुंड पत्रकाराच्या गळ्यातील ४० हजार रुपयांची सोन्याची साखळी ओरबडून नेतात. खिशात हात घालून पाकीट काढून घेतात. मोबाईल फोडून टाकतात, याला काय म्हणावे. यावरून या गुंडांना कायद्याचा धाकच उरला नाही, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.
राजुरा शहरात यापूर्वी अशी घटना कधीच घडली नाही. सोनियानगर आणि बेघरवस्ती या दोन वसाहतीतील वाद पोलिसांनी योग्य प्रकारे हाताळला नाही. त्यामुळेच ही भ्याड हल्ल्याची घटना घडली, असा आरोप आता केला जात आहे. अशा घटना घडल्यानंतर राजुरा शहरात पोलीस यंत्रणा आहे की नाही, अशी शंका येते. राजुराचे ठाणेदार प्रमोद डोंगरे रुजू झाल्यापासून शहरात नव्हे तर तालुक्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. चोरट्यांचा सातत्याने उच्छाद सुरू आहे. या चोरट्यांनी आमदार अॅड. संजय धोटे यांचे बंधू सतीश धोटे यांचे दुकान फोडले.
तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पंचायत समिती चौकातील ट्रॉफीक कंट्रोल लाईन बंद पडली आहे. वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. शहरात धनदांडग्यांची मिसरूडही न फुटलेली मुले वाऱ्याच्या वेगाने वाहने चालवून पादचारी ज्येष्ठ नागरिकांना हैराण करतात. पोलिसांनी तीन महिन्यात ६३ व्यक्तींंवर अवैध दारु विक्रीचे गुन्हे दाखल करुन पाच लाखांची दारु जप्त केली. मात्र तालुक्यातील गावागावांत दारुचा महापूर वाहतच आहे.
राजुरा शहरात काही दिवसांपूर्वी पंचायत समिती चौकात एकाला अडवून मारहाण करण्यात आली. देशी कट्टा घेऊन शहरात काही व्यक्ती शिरल्याची माहिती पोलिसांना होती. परंतु पोलिसांना आपला हिसका दाखविता आला नाही. राजुरा शहरात अवैध भंगार खरेदी, अवैध वाहतूक, ओव्हरलोड वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे चित्र आहे. एखादी माहिती पोलिसांना दिली तर ती माहिती सार्वजनिक होते. त्यामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास उडत चालला आहे.
राजुराचे तत्कालिन ठाणेदार संजय निकम यांची तर दहा महिन्यातच बदली झाली. येथील पाच वाहतूक पोलिसांची अकारण बदली करून त्यांना जिल्हा मुख्यालयात पाठविण्यात आले. त्यांची चौकशी समितीतर्फे चौकशी झाल्यानंतर ते निर्दोष आढळले. आता पोलिसच पोलिसांवर अन्याय करीत असतील तर सामान्य नागरिकांना न्याय कोण मिळवून देणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. राजुरा तालुक्यात सट्टापट्टीसुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू असून ‘एन्ट्री’ सुद्धा डबल केल्याची विश्वसनिय माहिती आहे. आॅटोवाल्यांकडूनसुद्धा हप्ते वसुल केले जात आहेत.
शहरात चार झोन पाडण्यात आले. मग एवढी गुंडागर्दी का वाढली. पत्रकारांवर हल्ला होत असताना हे झोनचे पोलीस कुठे होते. सगळे कसे आलबेल सुरू असून जोपर्यंत कडक कारवाई होणार नाही, तो पर्यंत गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच राहणार आहे. गुन्हेगारीचे प्रमाण कमी करायचे असेल तर पोलिसांचा दरारा वाढणे गरजेचे आहे. नाही तर ‘सेटलमेंट’ चे धोरण ठेवले तर परिस्थिती बिघडायला वेळ लागणार नाही.