निविदा न काढताच अभियंत्याची नियुक्ती
By admin | Published: April 24, 2017 01:03 AM2017-04-24T01:03:50+5:302017-04-24T01:03:50+5:30
नगरपरिषदेत योग्य प्रकारे निविदा प्रक्रिया न राबविता स्थापत्य अभियंता सल्लागाराची नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप ...
विलास टिपले यांचा आरोप : वरोरा नगरपरिषदेतील प्रकार, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
वरोरा : नगरपरिषदेत योग्य प्रकारे निविदा प्रक्रिया न राबविता स्थापत्य अभियंता सल्लागाराची नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष विलास टिपले यांनी केला आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे.
वरोरा नगरपरिषदेमध्ये २२ फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण सभा झाली. या सभेत पालिकेच्या बांधकाम विभागातील स्थापत्य अभियंता सल्लागारपदावर बी. जी. कन्सल्टन्सीची नियुक्ती करण्याचा ठराव पारित झाला. ही नियुक्ती करण्यासाठी कोणत्याही प्रकारची निविदा प्रक्रिया न राबविता अर्जदाराच्या अर्जावरच पालिकेच्या सभागृहाने निर्णय घेतला, असा आरोप माजी नगराध्यक्ष टिपले यांनी तक्रारीत केला आहे.
नगरपरिषद निधीअंतर्गत आणि वेगवेगळ्या शासकीय योजनेअंतर्गत होणाऱ्या विकास कामांचे नकाशे, अंदाजपत्रक, तयार करणे व त्यास मंजुरी प्राप्त करणे, स्ट्रक्चर डिझाईन करणे, व त्यास मंजुरी देणे, कामावर देखरेख ठेवणे, कंत्राटदाराने केलेल्या कामाची मोजणी पुस्तकात नोंद घेणे, त्यांचे देयक तयार करणे आदी कामे बी. जी. कन्सल्टन्सीला विनानिविदा देण्यात आली. हे चुकीचे आणि नियमबाह्य असल्याने त्याची चौकशी करून योग्य कारवाई करण्याची मागणीही टिपले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे .
या सर्वसाधारण सभेत मालवीय वॉर्डामधील खुल्या जागेचे प्रवेशद्वार, प्रभाग क्र. १ मधील सीसी ड्रेनचे व कांक्रीट नाला बांधकाम, प्रभाग ३ मधील पशुवैधकीय दवाखान्यापर्यंतचे सीसी ड्रेनचे बांधकामासंदर्भात निविदा दाखल करणाऱ्यांमध्ये चंद्रपूरच्या श्री. साई राम इंटरप्राईजेसची निविदा सर्वात कमी दराची होती. परंतु या कंपनीने काम करण्यास लेखी नकार दिल्यामुळे ही कामे दुसऱ्या क्रमांकाच्या जास्त दर असलेल्या कंत्राटदाराला तडजोड करून देण्यात आली. या भूमिकेवर माजी नगराध्यक्ष टिपले यांनी संशय व्यक्त केला आहे. तसेच हा प्रकार चुकीचा असून फेरनिविदा काढून काम घ्यायला हवे होते, असेही त्यांनी म्हटले आहे. (शहर प्रतिनिधी )