मायनिंगमधील खात्यांतर्गत जागा भरण्यास मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:24 AM2021-01-04T04:24:46+5:302021-01-04T04:24:46+5:30
नागपूर वेकोलि विभागात अनेक कोळशाच्या खाणी आहेत. मात्र, स्थानिक युवकांना रोजगार मिळाला नाही. त्यातच वेकोलि प्रशासनाकडून २०१८ पासून ...
नागपूर वेकोलि विभागात अनेक कोळशाच्या खाणी आहेत. मात्र, स्थानिक युवकांना रोजगार मिळाला नाही. त्यातच वेकोलि प्रशासनाकडून २०१८ पासून मायनिंगमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली नाही. परिणामी, मायनिंग अभ्यासक्रमामध्ये पास झालेले हजारो युवक अद्यापही नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. अनेकांनी वयोमर्यादा ओलांडली आहे. पात्रता असूनही नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे. त्यातच हैदराबाद येथे भरती प्रक्रिया राबवून तेथील युवकांना नियुक्ती करण्याचा कट रचला जात आहे. त्यामुळे नागपूर वेकोलिअंतर्गत येणाऱ्या कोळसा खाणीतील मायनिंग सरदार व ओव्हरमॅन पदाच्या रिक्त जागा भरण्यात याव्यात, अन्यथा नागपूर येथील सी.एम.डी. कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा आमदार किशोर जोरगेवार यांनी दिला होता. त्याची दखल घेत वेकोलि प्रशासनाच्या वतीने खात्यांतर्गत मायनिंग सरदार पदाच्या २३८ जागा भरण्यास मंजुरी दिली. मात्र, सर्वसाधारण जागा काढण्यात आल्या नसल्याने मायनिंगचे प्रशिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेल्या युवकांना वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सर्वसाधारण जागा भरण्याच्या मागणीसाठी ५ जानेवारी रोजी नागपूर येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.