३० एप्रिल: लॉकडाऊनसाठी प्रशासन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 05:00 AM2020-04-12T05:00:00+5:302020-04-12T05:00:47+5:30
राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या काळात आवश्यक असणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, अडकून पडलेल्या नागरिकांना निवारा, बेघर ,निराश्रित व व विमनस्क लोकांना रोजचे भोजन, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था व आरोग्य यंत्रणाआणखी नियोजनबद्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे आता १४ एप्रिल ही मर्यादा वाढवून ३० एप्रिलपर्यंत राज्यात लॉकडाऊन सुरू राहणार आहे. यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासन तयार असून नागरिकांची कुठलीही गैरव्यवस्था होणार नाही. याबाबतच्या उपाययोजना करण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यात येणारे प्रत्येक वाहन, प्रत्येक व्यक्ती तपासली जाईल व त्याचे निर्जंतुकीकरण केले जाईल.
सोबतच सीमावर्ती भागांमध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी स्वत: दक्ष राहून बाहेरून येणाºया नागरिकांची माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या काळात आवश्यक असणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, अडकून पडलेल्या नागरिकांना निवारा, बेघर ,निराश्रित व व विमनस्क लोकांना रोजचे भोजन, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था व आरोग्य यंत्रणाआणखी नियोजनबद्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
पोलिसांसाठी निर्जंतुकीकरण व्हॅन
जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेवर या काळामध्ये प्रचंड बंदोबस्ताचा तणाव आहे. पोलीस दलाला विविध ठिकाणी कर्तव्य पूर्तीसाठी जावे लागते. त्यांच्यासाठी एका निर्जंतुकीकरण वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नाकाबंदी करणारे कर्मचारी यांना कर्तव्य पूर्ण करताना कोणताही धोका संभवू नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आल्याचे डॉ.महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे
विनाकारण फिरणारे २४३ वाहने जप्त
जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू असताना व पूर्णत: लॉकडाऊन करण्याचे निर्देश असतानादेखील काही नागरिक विनाकारण घराबाहेर फिरत आहेत. अशा नागरिकांच्या २४३ वाहनांना जप्त करण्यात आले आहे. १०२ लोकांवर केसेस दाखल करण्यात आल्या असून पाच लाखावर दंड करण्यात आला आहे. नागरिकांनी पुढील काळात घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले आहे.
६४२ नागरिक निवारागृहात
जिल्ह्यामध्ये सध्या ६४२ नागरिक विविध निवारागृहामध्ये आश्रयास आहेत.. त्यांना ३० एप्रिलपर्यंत राहण्याची व जेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अन्य राज्यात अडकलेल्या नागरिकांनीदेखील या काळात आहे तिथेच राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शहरामध्ये महानगरपालिकेच्या पुढाकारातून विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने १७ हजारावर नागरिकांना भोजनदान करण्यात येत आहे. आजूबाजूच्या परिसरात कोणीही नागरिक उपाशी असल्यास या संदर्भातील हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांनी त्याची मदत घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
नव्या २६ लोकांपैकी २५ जणांचे नमुने निगेटिव्ह
जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सध्या २८ नागरिकांची वैद्यकीय तपासणी झाली असून त्यातील २६ लोकांचे नमुने घेण्यात आले आहे. त्यापैकी २५ नागरिकांचे नमुने निगेटिव्ह असून दोन नमुने प्रतीक्षेत आहेत. आतापर्यंत विदेशातून परत आलेल्या बाहेर राज्यातून बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची संख्या २६ हजार ६६३ आहे. त्यापैकी चार हजार ४८२ नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर यापैकी २२ हजार १८१ लोकांनी १४ दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा कालावधी पूर्ण केला आहे. ३० नागरिकांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे.