एप्रिल वाढविणार जिल्ह्याचा ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:24 AM2021-04-05T04:24:48+5:302021-04-05T04:24:48+5:30
चंद्रपूर : प्रदूषणामध्ये अव्वल असलेला चंद्रपूर जिल्हा तापमानामध्येही राज्यातच नाही, तर देशात अव्वल आहे. मागील काही दिवसांपासून उन्हाच्या झळा ...
चंद्रपूर : प्रदूषणामध्ये अव्वल असलेला चंद्रपूर जिल्हा तापमानामध्येही राज्यातच नाही, तर देशात अव्वल आहे. मागील काही दिवसांपासून उन्हाच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. पुढील महिनाभर उन्हाचा चटका आणखी वाढणार असल्याचे संकेत आहे. दरम्यान, शुक्रवारी चंद्रपूरचे ४३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे याच महिन्याच्या शेवटपर्यंत पारा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये, तसेच एप्रिलच्या सुरुवातीलाही पारा कमी होता. लाॅकडाऊनमुळे प्रदूषणाची तीव्रताही कमी झाली होती. मात्र, यावर्षी मार्चच्या शेवटीपासूनच तापमान चांगलेच वाढत आहे. मागील चार दिवसांपासून तर तापमानाचा उच्चांक झाला आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी रस्त्यावरील गर्दी ओसरली असून, जणू लाॅकडाऊनच झाला की काय, अशी स्थिती आहे. रविवारी दुपारच्या सुमारास रस्ते ओस पडल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, किमान तापमानातही वाढ होत आहे. त्यामुळे चंद्रपूरकरांना रात्रीही उकाड्याचा सामना करावा लागत आहे. मार्चअखेर उन्हाच्या तीव्रतेत झालेली वाढ, तसेच एप्रिलमध्येही कायम राहणार आहे. यामध्ये आणखी वाढच होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आतापासूनच सुरक्षात्मक साधनांचा वापर सुरू केला आहे. एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाच्या झळ्या जाणवत आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षीचा उन्हाळा नागरिकांना तापदायक ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
बाॅक्स
शुक्रवारी तापमानाचा उच्चांक
मागील चार ते पाच दिवसांपासून उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवत आहे. असे असले तरी शुक्रवारी (दि. २)ला चंद्रपूरच्या तापमानाची ४३.९ अश सेल्सिअस एवढी नोंद करण्यात आली, तर कमाल तापमानातही मोठी वाढ झाली असून, चाळीस अंश सेल्सिअस एवढी नोंद करण्यात आली.
बाॅक्स
असा राहील आठवडा
दरवर्षी विदर्भासह राज्यभरात चंद्रपूरचे तापमान अधिक असते. अनेकवेळा देशातसुद्धा तापमानामध्ये चंद्रपूर अग्रस्थानी असते. त्यामुळे यावर्षी उन्हाच्या झळा अधिक राहणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, पुढील आठवडाभरही उन्हाची तीव्रता अधिक राहणार आहे. कमाल तापमानाचा पारा अधिक वाढणार असून, रात्रीही नागरिकांना उकाडा जाणवणार आहे.