ब्रह्मपुरी आगाराच्या वाहतूक नियंत्रकाचा मनमानी कारभार
By admin | Published: June 11, 2016 12:57 AM2016-06-11T00:57:15+5:302016-06-11T00:57:15+5:30
ब्रह्मपुरी एसटी आगारातील वाहतूक नियंत्रकाच्या मनमानी कारभाराने प्रवासी त्रस्त झाले आहेत.
प्रवाशांना दमदाटी : अनियमित बसफेऱ्यांमुळे प्रवासी त्रस्त
मेंडकी : ब्रह्मपुरी एसटी आगारातील वाहतूक नियंत्रकाच्या मनमानी कारभाराने प्रवासी त्रस्त झाले आहेत. बसची चौकशी करण्यासाठी फोन केल्यास योग्य उत्तर मिळत नाही, अशी तक्रार प्रवाशांनी केली आहे.
१ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर एसटीचा ६८ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. महाराष्ट्रातील विविध एसटी आगारातील चालक वाहकापासून तर सफाई कामगार वर्धापन दिनाच्या उत्सवात सहभागी झाले होते. काही आगारामध्ये एसटीच्या प्रवाशांना थंड पेय, पाणी, मिठाई, फळे वाटण्यात आले तर काही ठिकाणी प्रवाशांचा सत्कार करण्यात आला.
मात्र ब्रह्मपुरी आगारातील वाहतूक नियंत्रक कार्यालयातील कर्मचारी प्रवाशांवर दूरध्वनीवर शिविगाळ केल्याचा प्रकार वर्धापन दिनी घडला. मेंडकी येथील अनंत सातव मागील आठ वर्षापासून सिंदेवाही येथे नोकरीला आहेत. ते रोज मेंडकी ते सिंदेवाही एसटी बसने प्रवास करतात. ब्रह्मपुरी ते वाढोणा सिंदेवाही ही बस मेंडकी बसस्थानकावर ८.४५ ला येण्याची वेळ आहे. मात्र १ जून रोजी ही बस ९.४५ ला आली. बसला उशिर झाल्याने अनंत सातव यांनी ९.३० च्या सुमारास ब्रह्मपुरी आगारातील चौकशी विभागात दूरध्वनी वरुण विचारणा केली असता, तेथील कार्यरत कर्मचाऱ्यांनी शिविगाळ केली. संबंधीत कर्मचाऱ्यांचे नाव विचारले असता, त्याने खालच्या पातळीवर बोलले. हा सर्व प्रकार उपस्थित प्रवाश्यांनी ऐकून घेत तक्रार केली आहे. (वार्ताहर)
अनंत सावत यांनी केलेली लेखी तक्रार मान्य आहे. या अगोदर सुद्धा वाहतूक नियंत्रकाच्या लेखी तक्रार आलेल्या असून वाहतूक नियंत्रकावर योग्य त्या कारवाईसाठी माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी दस्तावेज पाठविलेले आहे. कार्यवाही नक्कीच केली जाईल.
- जगदीश म्हशाखेत्रे, आगारप्रमुख, ब्रह्मपुरी.