आमच्या मुली शाळेत सुरक्षित आहेत का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2022 05:00 AM2022-04-04T05:00:00+5:302022-04-04T05:00:27+5:30
शिक्षण विभागाने खासगी व्यवस्थापनातील शाळांना सीसीटीव्ही लावण्याचे आदेश काही वर्षांपूर्वी दिले होते. मात्र, अनेकांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. आता पुण्यातील अत्याचाराचे प्रकरण समोर आल्यानंतर शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची सक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांनी लक्ष केंद्रीत केले असून सरकारी आणि खासगी शाळांमध्येही सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचा आदेश जारी केला आहे.
साईनाथ कुचनकार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पुण्यातील शाळेत विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण समोर आल्यानंतर मुलींच्या सुरक्षिततेच्या मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. शाळांमध्येसीसीटीव्हीमुळे मुलींची सुरक्षितता ठेवण्यास मदत होते. मात्र, जिल्ह्यातील तब्बल २ हजार ५५ शाळांमध्येसीसीटीव्ही नसल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये काही खासगी तसेच जिल्हा परिषद शाळांचाही समावेश आहे. त्यामुळे भविष्यात एखादी अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शिक्षण विभागाने खासगी व्यवस्थापनातील शाळांना सीसीटीव्ही लावण्याचे आदेश काही वर्षांपूर्वी दिले होते. मात्र, अनेकांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. आता पुण्यातील अत्याचाराचे प्रकरण समोर आल्यानंतर शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची सक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांनी लक्ष केंद्रीत केले असून सरकारी आणि खासगी शाळांमध्येही सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचा आदेश जारी केला आहे. मात्र, आता पालकांनीही सक्त होऊन व्यवस्थापन तसेच प्रशासनाला यासंदर्भात विचारणा करणे सध्या तरी गरजेचे आहे.
जिल्ह्यातील काही मोजक्याच आणि शहरातील इंग्रजी शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहे. मात्र ग्रामीण भागातील इंग्रजी खासगी शाळांध्येही सीसीटीव्ही नसल्याची स्थिती आहे.
अनेक शाळांमध्ये सीसीटीव्ही कागदावरच
- जिल्ह्यातील काही शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे. मात्र, त्यातील अनेक शाळांतील सीसीटीव्ही बंद आहे तर काही ठिकाणी केवळ कागदोपत्रीच सीसीटीव्ही असल्याचे दाखविण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.
पालक चिंतेत
शाळांमध्ये आपले मुले सुरक्षित राहील की नाही याची आता पालकांना चिंता सतावत आहे. खासगी शाळांसह जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही लावून विद्यार्थ्यांची सुरक्षितता बाळगणे सध्यातरी गरजेचे झाले आहे. प्रशासनाने सीसीटीव्ही लावण्याची सक्ती करावी.
वनश्री गेडाम, चंद्रपूर
शाळांमध्ये सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही असणे गरजेचे आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक शाळांत सीसीटीव्हीच नाही. विशेषत: जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही नाही. त्यामुळे अप्रिय घटना घडण्यापूर्वी सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही लावावेत.
-प्रतिभा कोडापे, चंद्रपूर