दारू दुकानाचा परवाना मिळविण्यासाठी तरुणांची फौज सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:21 AM2021-06-02T04:21:51+5:302021-06-02T04:21:51+5:30
औद्योगिक जिल्हा असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भाजप सरकारच्या काळामध्ये दारूबंदी झाली. त्यानंतर जिल्ह्याचे एकूण वातावरण बदलले. अनेकांना बेरोजगार व्हावे लागले ...
औद्योगिक जिल्हा असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भाजप सरकारच्या काळामध्ये दारूबंदी झाली. त्यानंतर जिल्ह्याचे एकूण वातावरण बदलले. अनेकांना बेरोजगार व्हावे लागले तर या व्यवसायावर अवलंबून असलेल्यांनी दुसऱ्या व्यवसायाचा मार्ग अवलंबला. विशेष म्हणजे, अवैध मार्गाने दारू आणून विक्रीला उधाण आले. परिणामी गल्लोगल्ली दारू मिळू लागली. त्यातच गुन्हेगारीचा आलेखही वाढला. या सर्व बाबींचा विचार करून राज्य सरकारचे चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी हटविली. मात्र अद्यापपर्यंत ती कधीपासून प्रत्यक्षात सुरू होणार यावर निर्णय झाला नाही. मात्र या व्यवसायात गुंतलेल्यांमध्ये आनंदाची लाट आहे. त्यांनी आता तयारी सुरू केली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील काही बेरोजगारांनीही या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला असून, अनेकांनी चाचपणी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, नवीन परवाना काढण्यासाठी कशी परवानगी घ्यावी लागते, काय करावे लागते यासह नवीन जागेचा शोधही या तरुणांनी घेणे सुरू केल्याचे बघायला मिळत आहे.
बाॅक्स
गल्लीबोळात चर्चेला उधाण
दारूबंदी उठल्यानंतर आता दारू दुकाने कधी सुरू होणार यावर चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, काही तरुणांनी नवीन परवान्यासाठी प्रयत्नही सुरू केले आहेत. या माध्यमातून बेरोजगारीवर मात करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र त्यांना नवीन परवाना मिळतो की त्यांची केवळ चर्चाच होते, हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये सर्वांनाच कळणार आहे.