शाळेत शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 11:06 PM2018-12-07T23:06:25+5:302018-12-07T23:06:37+5:30
भावी पिढीचे आरोग्य निरोगी व निरामय राहावे, जलजन्य आजारांपासून विद्यार्थ्यांना मुक्ती मिळावी, आजारपणामुळे शालेय अभ्यासक्रमात खंड पडू नये व ज्ञानार्जन सुलभपणे करण्यासाठी अनुदानित शाळांना वॉटर फिल्टर मंजूर करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : भावी पिढीचे आरोग्य निरोगी व निरामय राहावे, जलजन्य आजारांपासून विद्यार्थ्यांना मुक्ती मिळावी, आजारपणामुळे शालेय अभ्यासक्रमात खंड पडू नये व ज्ञानार्जन सुलभपणे करण्यासाठी अनुदानित शाळांना वॉटर फिल्टर मंजूर करण्यात येणार आहे. या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना शाळेत शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देण्याची घोषणा राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
येथील साईबाबा ज्ञानपीठ कॉन्व्हेंटमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन नुकतेच पार पडले. यावेळी उद्घाटक म्हणून नामदार मुनगंटीवार यांनी घोषणा करून अनुदानित शाळा संस्था चालकांना मोठा दिलासा दिला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिश शर्मा, पंचायत समितीचे सभापती गोविंदा पोडे, मुख्य कार्यपालन अधिकारी जितेंद्र पापळकर, संवर्ग विकास अधिकारी श्वेता यादव, उपसभापती इंदिरा पिपरे, जि. प. सदस्य हरिश गेडाम, वैशाली बुद्धलवार, पंचायत समिती सदस्य विद्या गेडाम, सोमेश्वर पद्मगिरीवार आदींची उपस्थिती होती.
दरम्यान चिंतामणी माध्यमिक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य तथा गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रशांत दोंतुलवार व स्व. गोपाळराव वानखेडे माध्यमिक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य नरेंद्र बोबडे यांनी शालेय विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करून देण्याच्या अनुषंगाने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदन सादर करून आग्रही मागणी केली होती. प्राचार्य प्रशांत दोंतुलवार व प्राचार्य नरेंद्र बोबडे यांच्या मागणीला ना. मुनगंटीवार यांनी तात्काळ मंजूर करून वॉटर फिल्टर यंत्रणा कार्यान्वित करण्याची घोषणा केली.
यामुळे प्राचार्य अनिता पंधरे, प्राचार्य संध्या बोबडे, प्राचार्य शैलेश झाडे, मुख्याध्यापक संजय चौधरी, मनोहर माडेकर, कोपुलवार यांच्या शाळेतील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.