पाणीपुरवठ्याची प्रलंबित कामे मार्गी लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 05:00 AM2021-11-25T05:00:00+5:302021-11-25T05:00:51+5:30
खासदार धानोरकर म्हणाले, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यावरील एकूण २० पुलांचे बांधकाम अपूर्ण आहे. ते काम कुठे अडले याबाबत विभागांनी माहिती घ्यावी. पुलाच्या बांधकामाचे प्रस्ताव १५ दिवसांच्या आत तयार करून मंजुरीसाठी सादर करावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. प्रपत्र ‘ड’ यादीत काही घरकूल लाभार्थ्यांची नावे ऑनलाईन मध्ये सुटली आहेत, अशांची माहिती घेत दखल घ्यावी. ज्या गावातील नागरिकांना अजूनही घरकूल मिळाले नाही त्या गावांचा प्रस्ताव शासनाला सादर करावा, अशा सूचना केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठ्याच्या योजना महत्त्वाच्या असून कोरोना काळात काही कामे प्रलंबित होती. मात्र, कोरोना कमी झाल्याने ही प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावा, असे निर्देश खासदार बाळू धानोरकर यांनी दिले. नियोजन भवनात बुधवारी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या (दिशा) बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, खासदार अशोक नेते, आमदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वर्षा गौरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे, श्याम वाखर्डे, प्रकल्प अधिकारी बक्षी आदी उपस्थित होते.
खासदार धानोरकर म्हणाले, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यावरील एकूण २० पुलांचे बांधकाम अपूर्ण आहे. ते काम कुठे अडले याबाबत विभागांनी माहिती घ्यावी. पुलाच्या बांधकामाचे प्रस्ताव १५ दिवसांच्या आत तयार करून मंजुरीसाठी सादर करावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. प्रपत्र ‘ड’ यादीत काही घरकूल लाभार्थ्यांची नावे ऑनलाईन मध्ये सुटली आहेत, अशांची माहिती घेत दखल घ्यावी. ज्या गावातील नागरिकांना अजूनही घरकूल मिळाले नाही त्या गावांचा प्रस्ताव शासनाला सादर करावा, अशा सूचना केल्या. प्रकल्प संचालक वर्षा गौरकर यांनी सादरीकरण केले. यावेळी भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, गोंडपिपरी पं. स. सभापती सुनीता येग्गेवार, जिवती पं.स. सभापती अंजना पवार, राजूरा पं. स. सभापती मुमताज अब्दुल, सावली पं.स. सभापती विजय कोरेवार, सिंदेवाही पं.स. सभापती मंदा बाळबुधे, नागभीड पं.स. सभापती प्रफुल्ल खापर्डे, जि. प. सदस्य सुनीता धोटे, पवन भगत, कुंदा जेनेकर, कुचनाच्या सरपंच वर्षा ठाकरे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
चार गावांचा पाणीपुरवठा बंद
जलजीवन मिशन अंतर्गत वरोरा तालुक्यातील शेंबळ, राळेगाव, फत्तापूर व बोडखा या चार गावांचा पाणीपुरवठा बंद आहे. तो कार्यान्वित करावा. शालेय पोषण आहार योजना संदर्भात केंद्र व राज्य शासनाकडून धान्याचा पुरवठा होतो. त्याचा दर्जा व साठवणूक आदींसाठी धान्याच्या गोडाऊनची पाहणी करावी. आठवड्यातून एकदा शाळांना भेटी द्याव्यात, अशा सूचनाही खासदार धानोरकर यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना केल्या.