धुमाकूळ घालणाऱ्या वाघाचा बंदोबस्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:36 AM2019-03-08T00:36:19+5:302019-03-08T00:36:44+5:30
मागील एका वर्षापासून तालुक्यातील चिचगाव, वांद्रा, डोर्ली, आवळगाव, हळदा, मुडझा, बल्लारपूर, एकारा, भूज व नवेगाव परिसरात पट्टेदार वाघासह बिबट्यांचा धुमाकूळ वाढला आहे. पाळीव जनावरे व नागरिकांवर हल्ले होत असल्याने दहशत पसरली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : मागील एका वर्षापासून तालुक्यातील चिचगाव, वांद्रा, डोर्ली, आवळगाव, हळदा, मुडझा, बल्लारपूर, एकारा, भूज व नवेगाव परिसरात पट्टेदार वाघासह बिबट्यांचा धुमाकूळ वाढला आहे. पाळीव जनावरे व नागरिकांवर हल्ले होत असल्याने दहशत पसरली. त्यामुळे वाघासह हिंस्त्र वन्यप्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी वन विभागाने गांगलवाडी येथे घेतलेल्या चर्चासत्रात केली.
यावेळी चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव, ब्रम्हपुरी उप वनसंरक्षक कुलराज सिंह, ठाणेदार मकेश्वर, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, मानद वन्यजीव रक्षक विवेक करंबेळकर, पं.स सदस्य रामलाल दोनाडकर, पं. स सदस्य सुनीता ठवकर, पं. स. सदस्य निलकंठ मानापुरे, गांगलवाडीचे सरपंच ज्ञानेश्वर भोयर व तालुक्यातील ३८ गावांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
वन्य प्राण्यांमुळे पिकांचे नुकसान व पाळीव जनावरे तसेच नागरिकांवर होणारे हल्ले टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करत आहे, याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली. परंतु, नागरिकांचे समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांनी विविध उपाययोजना सुचविल्या. विविध योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटी सांगितल्या. वन विभाग व पोलीस विभागाने गावकऱ्यांच्या समस्या जाणून निर्णय घेण्याची भूमिका उपस्थितांनी मांडली. मानद वन्यजीव रक्षक करंबेळकर, पं. स सदस्य दोनाडकर, पं. स. सदस्य ठवकर, पं. स. सदस्य मानापुरे, सरपंच भोयर यांनीही समस्येवर उपाययोजना सुचिवल्या. यावेळी वन विभागाचे कर्मचारी, वन कामगार, सरपंच, पोलीस पाटील, महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष, गाव वन समितीचे सदस्य उपस्थित होते.